केंद्राकडून युरियावर प्रति गोणी ३७०० रुपये सब्सिडी; मनसुख मांडविया यांची माहिती

केंद्राकडून युरियावर प्रति गोणी ३७०० रुपये सब्सिडी; मनसुख मांडविया यांची माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकार युरियावर प्रति गोणी सुमारे ३७०० रुपये सब्सिडी देत आहे. शेतकऱ्यांना युरियासह अन्य खते माफक दरात मिळावीत यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सरकार युरिया सब्सिडीचा मोठा भार उचलत आहे, अशी माहिती केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सब्सिडी दरात मिळणाऱ्या युरियाची मूळ किंमत किती आहे याचीही माहिती दिली. भारतात युरियाची किंमत प्रति गोणी २६६.७० रुपये आहे. तर पाकिस्तानात ८०० रुपये, इंडोनेशियात ६०० रुपये, चीनमध्ये २,१०० रुपये, बांगलादेशात ७१९ रुपये, अमेरिकेत ३,०६० रुपये आणि ब्राझीलमध्ये ३,६०० रुपये युरियाची किंमत असल्याचे मांडविया यांनी सांगितले.

विदेशात युरियाची किंमत प्रति गोणी ४ हजार रुपये आहे. पण भारतात युरियाची किंमत २६६ रुपये आहे. सरकार युरियावर सुमारे ३७०० रुपये सब्सिडी देत असल्याने शेतकऱ्यांना माफक दरात युरिया उपलब्ध होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले की युरियाचा देशांतर्गत वापर ३२५ लाख मेट्रिक टन आहे. तर उत्पादन केवळ २५० लाख मेट्रिक टन आहे. यामुळे देशांतर्गत मागणीच्या पूर्ततेसाठी ७५ लाख मेट्रिक टन युरियात विदेशातून आयात केला जातो. डीएपी खताच्या प्रति गोणीवर २,६५० रुपये सब्सिडी दिली जात आहे. खतांच्या वाढत्या किमतीचा भार शेतकऱ्यांवर पडू नये यासाठी सरकार सब्सिडीचा मोठा भार उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, खते व रसायन राज्य मंत्री भगवंत खुबा यांनी म्हटले की, केंद्र सरकार सर्व राज्यांना एकाच दरात खतांचा पुरवठा करते. किमतीवरून राज्यांत भेदभाव केला जात नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आहे. माफक दरात पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news