नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेस अखेर सुरुवात | पुढारी

नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेस अखेर सुरुवात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेस अखेर रविवारपासून सुरुवात झाली. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर मार्च २०२० मध्ये नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु झाल्यामुळे भारत जगाशी जोडले जाईल, अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने शिंदे यांनी दिली. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात १३५ नवीन विमाने कार्यान्वित केली जाणार असल्याचे सांगतानाच गोरखपूर ते वाराणसीदरम्यान रविवारपासून हवाई सेवा सुरु झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

उन्हाळी सुट्ट्यांसाठीचे हवाई सेवेचे वेळापत्रक आजपासून कार्यान्वित झाले आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत या वेळापत्रकानुसार हवाई सेवा चालविली जाईल. उन्हाळी सुट्टीच्या काळात मॉरिशस, मलेशिया, थायलंड, तुर्की, अमेरिका, इराक आदी देशांसाठी १ हजार ७८३ फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत इंडिया सलाम एअर, एअर अरेबिया अबुधाबी, क्वांटास, अमेरिकन एअरलाईन्स या विमान कंपन्या प्रथमच भारतात सेवा देणार आहेत, असेही हवाई वाहतूक मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button