rahul gandhi : गुजरातमध्‍ये काँग्रेसकडून ‘डॅमेज कंट्रोल’साठी समिती | पुढारी

rahul gandhi : गुजरातमध्‍ये काँग्रेसकडून 'डॅमेज कंट्रोल'साठी समिती

अहमदाबाद ; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर उत्तराखंड आणि गोवा विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.  या निराशाजनक हार पत्करल्यानंतर पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पक्षाकडून मागच्या काही दिवसांपासून यावर विचारमंथन सुरू आहेत. याचबरोबरब या वर्षाच्‍या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात म्हणजे गुजरातमध्‍ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी काँग्रेस नवीन रणनिती आखण्याच्या तयारीत आहे. (rahul gandhi)

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची मदत घेण्याची शक्यता आहे. यावर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील काही प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. प्रशांत किशोर यांना गुजरात निवडणूकीतील काम देण्यासाठी चर्चा झाली. परंतू त्यांना काम देण्याबाबत अजून निर्णय झाला नाही. मागील दोन दिवसांपासून गुजरात निवडणुकीवर चर्चा सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्यासोबत काँग्रेसने पडद्यामागून चर्चांना सुरूवात केली आहे. मात्र काँग्रेसने अशी कुठेही चर्चा झाली नसल्याचे सांगितले; पण प्रशांत किशोर यांच्या निटवर्तीशी काँग्रेस संपर्कात असून, त्‍यांनी गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसचे काम पाहावे, अशी विनंती केल्‍याची चर्चा आहे.

rahul gandhi : प्रशांत किशोर यांच्या टीमने तेलंगणातील काम हाताळले

तेलंगणा राष्ट्र समितीने (TRS) पुढील निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी किशोर यांना आधीच नियुक्त केले आहे. प्रशांत किशोर यांनी अलीकडेच मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीच्या योजना आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) विरुद्ध राव यांच्या प्रस्तावित आघाडीवर त्यांनी चर्चा केल्याचे समजते. राष्ट्रीय पर्यायाचा विचार करण्यासाठी त्यांनी त्यांच्या टीमच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे निकाल टीआरएस प्रमुखांना दिल्याचेही मानले जात आहे.

गुजरात काँग्रेसमध्ये बदल

काँग्रेसने गुरुवारी आपल्या गुजरातमधील काही नेत्यांची पुनर्रचना केली आणि २५ उपाध्यक्ष आणि ७५ पक्षाच्या सरचिटणीसांची नियुक्ती केली. गुजरातमधील पक्षाच्या नेत्यांनी, राज्य AICC प्रभारी रघु शर्मा आणि राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पक्ष मजबूत करण्याबाबत चर्चा केल्यानंतर दोन दिवसांनी ही नियुक्ती झाली आहे.

काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल समितीची स्थापना

काँग्रेसने आपल्या पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी गुजरातमध्ये एक समिती स्थापन केली आहे. या समितीला ‘डॅमेज कंट्रोल’ असे नाव देण्यात आले आहे. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षांतराच्या समस्येला तोंड देण्यासाठी हा प्रयत्‍न आहे..

गेल्या काही वर्षांत अनेक काँग्रेस आमदार आणि नेत्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार पक्ष आता निष्ठावान अशा नेत्यांना तिकीट देईल. ज्या नेत्यांनी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला त्यांना तिकीट मिळणार नाही.वास्तविक, महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पक्षात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामुळेच पक्षाने प्रथमच डॅमेज कंट्रोल कमिटी स्थापन केली आहे. कोणताही नेता नाराज होऊन पक्ष सोडू नये, यासाठी गुजरात काँग्रेस अध्यक्षांनी वडोदरातील प्रमुख नेत्यांना या समितीमध्ये समाविष्ट करण्यास सांगितले.

हेही वाचलं का?

Back to top button