Akhilesh resigned : अखिलेश यादव २०१९ मधील चूक टाळणार?, आता ‘फाेकस’ युपी! | पुढारी

Akhilesh resigned : अखिलेश यादव २०१९ मधील चूक टाळणार?, आता 'फाेकस' युपी!

!पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळवलं. मात्र एक प्रबळ विरोधी पक्ष म्‍हणून जनतेने समाजवादी पार्टीलाही पुन्‍हा एकदा बळ दिलं. या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मैनपुरी जिल्‍ह्यातील करहल मतदारसंघातून लढवली. ते बहुमतान जिंकलेही. आता अखिलेश खासदार म्‍हणून राजधानी दिल्‍ली काम पाहणार की, उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रीत करणार, असा सवाल केला जात होता.  या प्रश्‍नावर आज पडदा पडला. अखिलेश यांनी खासदारकीचा राजीनामा ( Akhilesh resigned ) दिला आहे. आता ते पूर्णवेळ उत्तर प्रदेशच्‍या राजकारणावर आपले लक्ष केंद्रीत करतील. अखिलेश याच्‍या पाठोपाठ समाजवादी पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते आझम खान यांनीही खासदारकीच राजीनामा दिला आहे. त्‍यामुळे सपाने २०२७ मधील विधानसभा निवडणुकीची रणनीती आतापासूनच आखण्‍यास सुरुवात केली आहे, असे मानले जात आहे.

Akhilesh resigned :अखिलेश २०१९ मधील चूक पुन्‍हा करणार नाहीत…

राजकीय विश्‍लेषकांच्‍या मतानुसार, समाजवादी पार्टीने २०१७ मध्‍ये उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावली. यानंतर अखिलेश यादव यांनी आपले लक्ष २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीवर केंद्रीत केले. एका अर्थाने ते राष्‍ट्रीय राजकारणात सक्रीय झाले. २०१९ च्‍या लोकसभा निवडणूक जिंकत त्‍यांनी लोकसभा गाठली. यानंतर त्‍यांची राज्‍यातील राजकारणातील सक्रीयता कमी झाले. अनेक प्रसंगात तर काँग्रेसच्‍या महासचिव प्रियंका गांधी प्रकाशझोतात आल्‍या.तर अखिलेश यादव यांचा जनसंपर्क केवळ ट्‍विटरवर दिसून येत होता. यामुळे समाजवादी पार्टीला मानणार्‍या कार्यकत्यांसह समर्थक जनतेच्‍या मनात एक गैरसमज निर्माण झाला.अखिलेश यांचे उत्तर प्रदेशकडे दुर्लक्ष झाले. याचा फटका २०२२च्‍या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बसला.

मुलायमसिंह यादव यांनी दिला बहूमूल्‍य ‘सल्‍ला’

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, होळी सणानिमित्त मुलायमसिंग यादव यांचे कुटुंबीय पुन्‍हा एकदा एकत्र आले. यावेळी अखिलेश यादव यांच्‍या पुढील राजकीय वाटचालीबाबात खल झाला. समाजवादी पार्टीचे संरक्षक आणि अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी आता यापुढे अखिलेश याने राष्‍ट्रीय राजकारणापेक्षा उत्तर प्रदेशच्‍या राजकारणात लक्ष केंद्रीत करावे, असा सल्‍ला दिला. तसेच २०२७ विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु करावी, असेही सूचवले. याला समाजवादी पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते राम गोपाल यादव यांनीही समर्थन दिले. त्‍यामुळे अखिलेश यापुढे केवळ उत्तर प्रदेशच्‍या राजकारणावर लक्ष केंद्रीत करतील, असे मानले जात आहे.

समाजवादी पार्टीच्‍या मतांमध्‍ये मोठी वाढ

नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत समाजावादी पार्टीचा पराभव झाला. तरीही २०१७ च्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या तुलनेत पक्षाच्‍या मतांमध्‍ये मोठी वाढ झाली आहे. २०१७ मध्‍ये समाजवादी पार्टीला ४०३ पैकी ४७ जागा मिळाल्‍या होत्‍या. तब्‍बल १७७ जागा गमावल्‍या होत्‍या. मात्र २०२२च्‍या निवडणुकीत समाजवादी पार्टीला १११ जागा मिळाल्‍या आहेत. या निकालानंतर समाजवादी पार्टीचा उत्‍साह वाढला आहे. मागील निवडणुकीच्‍या तुलनेत भाजपच्‍या जागा कमी झाल्‍या आहेत तर समाजवादी पार्टीच्‍या वाढल्‍या आहेत, असे अखिलेश यांनी म्‍हटलं होते.

आता अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आता ते स्‍वत:विरोधी पक्ष नेतेपद स्‍वीकारत उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांचा थेट मुकाबला करणार? की, दुसरा चेहरा पूढे करुन स्‍वत: मार्गदर्शकाच्‍या भूमिकेत राहणार, हे काही दिवसांमध्‍येच स्‍पष्‍ट होणार आहे. एवढी मात्र निश्‍चित की, आता समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशमध्‍ये प्रमुख विरोधी पक्ष म्‍हणून भाजपसमोर कडवे आव्‍हान निर्माण करण्‍याच्‍या तयारीत आहे.

आझम खान यांचीही अखिलेश यांना साथ

समाजवादी पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते व माजी मंत्री आझम खान यांनीही लोकसभा सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला आहे. ते रामपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्‍व करत होते. त्‍यांनी याच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. तर त्‍याचा मुलगा अबुदला आझम यांनीही विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सध्‍या आझम खान हे विविध गुन्‍ह्यांखाली सीतापूर कारागृहात आहेत. त्‍यांनी कारागृहातूनच विधानसभा निवडणूक लढवली होती. त्‍यांनी भाजप उमेदवारांचा ६६ हजार मतांनी पराभव केला. आता त्‍यांनीही लोकसभा सदस्‍यत्‍वाचा राजीनामा देत राज्‍यातील राजकारणात लक्ष केंद्रीत करणार असल्‍याचे अप्रत्‍यक्ष संकेत दिल्‍याचे मानले जात आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

 

Back to top button