एन बिरेन सिंह सलग दुसऱ्यांदा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान | पुढारी

एन बिरेन सिंह सलग दुसऱ्यांदा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

इम्फाळ; पुढारी ऑनलाईन

मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते एन बिरेन सिंह यांनी आज शपथ घेतली. ते सलग दुसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा झाला. राज्यपाल गणेशन यांनी एन बिरेन सिंह यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

मणिपूर मुख्‍यमंत्रीपदाचा पेच सोडविण्‍यासाठी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या निवासस्‍थानी महत्‍वपूर्ण बैठक झाली होती. त्यानंतर काल रविवारी भाजपच्‍या केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन, किरेन रिजिजू यांच्‍या उपस्‍थितीत बैठक झाली होती. यानंतर मणिपूर विधिमंडळ नेतेपदी एन बिरेन सिंह यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले होते.

मणिपूर विधानसभेसाठी २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च अशा दोन टप्‍प्‍यांत मतदान झाले होते. ६० जागा असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपला ३२ जागा मिळाल्‍या आहेत. यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्‍या तब्‍बल ११ जागा वाढल्‍या आहेत. २०१७ मधील विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने नॅशनल पीपल्‍स पार्टी, नागा पीपल्‍स फ्रंट, लोक जनशक्‍ती पार्टी यांच्‍या मदतीने सरकार स्‍थापन केले होते.

आता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. तर नॅशनल पीपल्‍स पार्टीने (एनपीपी) सात जागांवर विजय मिळवला. नागा पीपल्‍स फ्रंटने ५ आणि कुकी पीपल्स अलायन्सला २ जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना ३ जागा मिळाल्या आहेत.

चौफेर घोडदौड करीत भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभांवर आपला झेंडा फडकावला आणि २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांची ऐतिहासिक मॅच सलग तिसर्‍यांदा जिंकण्याच्या दिशेने खणखणीत ‘चौकार’ मारला आहे. या पाचही राज्यांत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे.

Back to top button