Panjab Exit Poll : पंजाबमध्ये सत्तेची माळ ‘आप’च्या गळ्यात; काॅंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर | पुढारी

Panjab Exit Poll : पंजाबमध्ये सत्तेची माळ 'आप'च्या गळ्यात; काॅंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

चंदीगड, पुढारी ऑनलाईन : पाच राज्यांच्या निवडणुकीचे मतदान आज पार पाडले. आता त्याचे एक्झिट पोलदेखील यायला सुरूवात झाली आहे. पंजाब राज्याचे एक्झिट पोल आले आहेत. पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन होण्याची दाट शक्यता एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आली आहे. विशेष हे की, भाजपा नाही की, काॅंग्रेस नाही… पंजाब थेट अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या सत्तेच्या चाव्या देताना दिसत आहेत. (Panjab Exit Poll)

एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये ‘आप’ पक्षाला ५६-६१ जागा मिळताना दिसत आहे. यावरून पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून आम आदमी पार्टी उदयास येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पंजाबमधील मुख्यमंत्री पदाची माळ आम आदमी पार्टीच्या भगवंत मान यांच्या गळ्यात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. पोलनुसार दुसऱ्या क्रमांकावर काॅंग्रेस तर तिसऱ्या क्रमांकावर भाजप असल्याचे दिसत आहेत. भाजपाचा विचार करता, त्यांच्या वाट्याला पंजाबमध्ये १-६ जागाच मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

TV9 Bharatvarsh/Polstart यांनी पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केलेले आहेत. त्यांच्याच पोलनुसार पंजाबमध्ये आम आमदी पार्टीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिल्लीनंतर दुसऱ्या राज्यात म्हणजेच पंजाबमध्ये आपला प्रभाव निर्माण करत सत्ता हस्तगत करण्यास आप यशस्वी ठरली आहे. पोलच्या आकडेवारीनुसार ‘आप’ला ५६-६१ जागा, काॅंग्रेसला २४-२९ जागा, अकाली दलाला २२-२६ जागा आणि भाजपाला १-६ जागा येण्याची शक्यता आहे. (Panjab Exit Poll)

या आकडेवारीनुसार विरोधीपक्षाच्या बाकावरील प्रमुख पदावरून काॅंग्रेस आणि अकाली दलामध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे. अपक्षांना ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. टक्केवारीचा विचार करता, आपला ४१.२ टक्के, काॅंग्रेसला २३.२ टक्के, अकाली दलाला २२.५ टक्के, भाजपा आघाडीला ७.२ टक्के आणि अपक्षांना ५.९ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया टुडेचा एक्झिट पोल… 

यांचादेखील एक्झिट पोल हा पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा दिशेने गेलेला दिसतो. त्यांनीही असं सांगितले आहे की, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला तब्बल ७६-९० जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काॅंग्रेसला १९-३१ जागा, भाजपाला केवळ ४ जागा, अकाली दलाला ७ ते ११ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काॅंग्रेसला पंजाबमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता दिसते आहे.

Back to top button