नारीशक्ती पुरस्कारांचे उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण | पुढारी

नारीशक्ती पुरस्कारांचे उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत वर्ष २०२० आणि २०२१ साठीच्या नारीशक्ती पुरस्कारांचे वितरण मंगळवारी (दि. ८ ) रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते केले जाणार आहे.

विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या २९ महिला व महिलांसाठीच्या संस्थानामार्फत हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी महिलांशी संवादही साधणार आहेत.

वर्ष २०२० आणि २०२१ साठी एकूण २९ नारीशक्ती पुरस्कार दिले जाणार आहेत. महिला संस्थांबरोबर उद्योजकता, सामाजिक कार्य, कृषी, इनोव्हेशन, शिक्षण, साहित्य, भाषा, कला आणि हस्तकला, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, मर्चंट नेव्ही, वन संवर्धन इ. क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये गणिततज्ञ नीना गुप्ता, आदिवासी कार्यकर्त्या उषाबेन वसावा, अनिता गुप्ता, नसीरा अख्तर, इंटेल इंडियाच्या प्रमुख निवरुती रॉय, कथक नर्तिका सायली आगवणे, सर्प बचावासाठी काम करणाऱ्या वनिता बोराडे आदींचा समावेश आहे.

हेही वाचलंत का? 

video : Power Women Pudhari Exclusive : महिला दिनानिमित्त पुढारीच्या वतीने विशेष मुलाखती

Back to top button