राजेश क्षीरसागर : जयप्रभा स्टुडिओच्या माध्यमातून माझ्या बदनामीचे राजकीय षड्यंत्र | पुढारी

राजेश क्षीरसागर : जयप्रभा स्टुडिओच्या माध्यमातून माझ्या बदनामीचे राजकीय षड्यंत्र

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जयप्रभा स्टुडिओच्या आडून विरोधकांनी निवडणुकीच्या तोंडावर माझ्या बदनामीचे राजकीय षड्यंत्र रचले आहे; परंतु त्यात ते यशस्वी होणार नाहीत. कारण, जयप्रभा स्टुडिओची जागा राज्य शासनाने ताब्यात घेण्यासाठी स्वतः पाठपुरावा करत आहोत. त्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका प्रशासन यांनाही पत्रे दिली आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

लता मंगेशकर स्मारकासाठी प्रयत्न

यासंदर्भातील वादावर बोलताना ते म्हणाले, जयप्रभा स्टुडिओेची जागा भारतरत्न कै. लता मंगेशकर यांनी खरेदी केली होती. स्टुडिओे परिसरातील बहुतांश जागा मंगेशकर यांनी काही वर्षांपूर्वी विकली आहे. उर्वरित जागा श्री महालक्ष्मी स्टुडिओज एल. एल. पी. या फर्मने कायदेशीररीत्या खरेदी केली आहे. माझा मुलगा ऋतुराज हा सिव्हिल इंजिनिअर आहे.

कायदेशीररीत्या भागीदारीत त्याने फर्मच्या माध्यमातून ती जागा विकत घेतली. परंतु स्टुडिओशी जनभावना जोडल्या असून ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, यासाठी पर्यायी जागा स्वीकारून स्टुडिओची जागा शासनाच्या ताब्यात देण्यास सहमती द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्मारकाबाबतच्या मागणीस पाठिंबा आहे. जास्तीत जास्त निधी देऊन स्मारक पूर्ण करावे, अशी माझीही भावना आहे.

‘जयप्रभा’ पाडणार ही अफवा…

फर्ममधील काही भागीदारांचे कै. लता मंगेशकर यांच्याशी गेली अनेक वर्षे व्यावसायिक संबंध होते. त्यांनी 10 वर्षांपूर्वीच करार केला होता. संपूर्ण कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा खरेदी व्यवहार केला आहे. यात पुरातन वास्तूंना धोका न पोहोचता संगीत, कला, नाट्य क्षेत्राच्या द‍ृष्टीने विकसित करण्याचा श्री महालक्ष्मी स्टुडिओज या भागीदारी संस्थेचा उद्देश होता; जयप्रभा स्टुडिओ विकला, तो पाडला जाणार, असा अपप्रचार केला जात आहे.

कोट्यवधींचा निधी आणल्याने विरोधक हैराण

दोन वर्षांत कोल्हापूर शहरासाठी कोट्यवधींचा निधी आणल्याने विरोधक हैराण झाले आहेत. त्यातूनच जागा मी विकत घेऊन दिली, असा गैरसमज निर्माण केला जात आहे. मात्र, जयप्रभा स्टुडिओच्या खरेदी व्यवहाराशी आपला काडीमात्र संबंध नाही, असेही राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

कलाकारांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही

कोल्हापुरातील नागरिकांच्या भावनांचा मी नेहमीच आदर करतो.कोल्हापूरशी संबंधित सर्व लढ्यात मी अग्रभागी असतो. जयप्रभा स्टुडिओ संदर्भातही मी कुणाला मान खाली घालू देणार नाही. जमीन ट्रान्स्फर झाल्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून स्टुडिओला गतवैभव प्राप्‍त करून देऊन कलाकारांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Back to top button