सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मृतदेहाला मुंग्या | पुढारी

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मृतदेहाला मुंग्या

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत घोषित केलेल्या एका रुग्णाच्या शरीराला मुंग्या लागल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पुन्हा अधिकारी, कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.

सोलापूर शहरातील बुधवार पेठ इथल्या राकेश मोरे या 20 वर्षीय युवकावर मागील चार दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टीबी आजारावर उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान राकेश मृत झाल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी राकेशच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना एक धक्कादायक प्रकार दिसून आला.

मृत राकेशच्या संपूर्ण शरीराला मुंग्या लागल्या होत्या. राकेशला लावण्यात आलेल्या ऑक्सिजन मास्कलाही मुंग्या लागल्या होत्या. त्यामुळे राकेशच्या मृत्यूस सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप राकेशच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांत जाऊन दाद मागणार असल्याची माहिती राकेशच्या नातेवाईकांनी दिली आहे.
चौकशीअंती दोषींवर कारवाई : डॉ. चिटणीस

सिव्हिलमधील मृताच्या शरीराला गुंग्या लागल्याचे आढळून आल्याबाबत सिव्हिल सर्जन ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता. त्यानंतर कोव्हिड नोडल ऑफिसर डॉ. अग्रजा चिटणीस यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी घडलेल्या घटनेबाबत चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Back to top button