‘Why I Killed Gandhi’ चित्रपटावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार | पुढारी

‘Why I Killed Gandhi’ चित्रपटावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (Why I Killed Gandhi) या चित्रपटाच्या स्ट्रीमिंगवर बंदी घालण्यास नकार दिला. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जे.के माहेश्वरी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला दिली आहे. याचिकाकर्त्याच्या मूलभूत अधिकाराचे हनन झालेले नाही. अशात अनुच्छेद ३२ अंतर्गत सुनावणी करता येणार नाही असे खंडपीठाने स्पष्ट केले.

महात्मा गांधी आणि गोडसेवर बनवण्यात आलेल्या चित्रपटाला सेंसर बोर्डाकडून मंजुरी मिळालेली नाही. असे असताना देखील चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. महात्मा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला असून त्यांचे मारेकरी नाथूराम गोडसे यांचा गौरव करण्यात आला आहे. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आल्यास यामुळे केवळ द्वेष पसरेल. चित्रपटच्या माध्यमातून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे.अशात चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. (Why I Killed Gandhi)

चित्रपटाच्या २ मिनिट २० सेंकदांच्या ट्रेलर मध्ये भारताची फाळणी आणि पाकिस्तानात हिंदुविरोधातील अत्याचारासाठी महात्मा गांधी यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चित्रपटातून महात्मा गांधी यांच्या हत्येला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा देखील दावा याचिकेतून करण्यात आला होता. (Why I Killed Gandhi)

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्हाय आय किल्ड गांधी (why i killed gandhi) या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. गोडसेची भूमिका साकारल्याने अमोल कोल्हेंवर अनेकांनी टीका केली. तर काहींनी त्यांचे समर्थन ही केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांनीही त्यांचे कलाकार म्हणून समर्थन केले. मात्र, अखेर अनेक दिवसांनी अमोल कोल्हे यांनी २९ जानेवारीला आत्मक्लेश केला आहे. अमोल कोल्हे यांनी आळंदीत इंद्रायणी घाटावर आत्मक्लेश केला. ‘अनेक युवा कार्यकर्त्यांनी चूक झाल्याचे सांगितले. तुम्हाला आम्ही छत्रपतींच्या भूमिकेत पाहिलंय. नथुरामच्या या भूमिकेत पाहू शकत नाही अशी भूमिका त्यांनी सांगितले, म्हणून मी गांधीजींच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आत्मक्लेश करत आहे’, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रपित्या विषयी हा संशय होऊ नये म्हणून आत्मक्लेश करत असल्याचेही कोल्हे म्हणाले.

Back to top button