उत्तराखंडात काँग्रेसने बदलले अनेक उमेदवार | पुढारी

उत्तराखंडात काँग्रेसने बदलले अनेक उमेदवार

डेहराडून : पुढारी वृत्तसेवा: उत्तराखंडमधील लढतींचे बहुतांश चित्र स्पष्ट झाले असले, तरी ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवार अदलाबदलीची प्रक्रिया सुरू असल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.

रामनगर

माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना सर्वप्रथम रामनगर मतदारसंघातून तिकीट दिले होते. तथापि, ऐनवेळी काँग्रेसने रावत हे लालकुआमधून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. रावत यांची कन्या अनुपमा यांना हरिद्वार ग्रामीण मतदारसंघात लॉटरी लागली आहे.

लालकुआमध्ये आधी संध्या दालाकोटी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. रामनगरमध्ये हरीश रावत यांच्या जागी महेंद्रपाल सिंग यांना संधी दिली आहे. सिंग यांचे नाव आधी कलडहुंगी मतदारसंघातून जाहीर केले होते. रामनगरमध्ये आता सिंग विरुद्ध भाजपचे दिवानसिंग बिष्ट यांच्यात लढत होईल.

डेहराडून कॅन्ट

डेहराडून कॅन्टमध्ये काँग्रेसचे सूर्यकांत धस्माना यांच्या विरोधात भाजपच्या सविता कपूर यांच्यात लढत आहे. कपूर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील अनेक असंतुष्टांनी सविता यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. सविता कपूर या माजी आमदार स्व. हरिवंश कपूर यांच्या पत्नी आहेत. डेहराडून कॅन्टच नव्हे, तर आमदार कुंवर प्रणव चॅम्पियन यांच्या पत्नी कुंवरानी देवयानी यांना तिकीट दिल्यावरूनही भाजपमध्ये असंतोष आहे. बंडखोर नेते काँग्रेस, ‘आप’ला पाठिंब्याची भाषा करत आहेत, तर काही अतिउत्साही नेत्यांनी अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

लँडस्डाऊन

भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या हरकसिंग रावत तसेच त्यांची सून अनुकृती गुसेन या दोघांना काँग्रेसने तिकीट दिले. अनुकृती यांना अपेक्षेनुसार लँडस्डाऊनमधून तिकीट दिले आहे. पर्यटनात आघाडीवर असलेला लँडस्डाऊन मतदारसंघ पौडी गढवाल जिल्ह्यात येतो. भाजपने दिलीपसिंग रावत यांना पुन्हा येथून तिकीट दिले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button