उत्तराखंड निवडणूक : आम आदमी पक्षाचा वाढता जोर | पुढारी

उत्तराखंड निवडणूक : आम आदमी पक्षाचा वाढता जोर

उत्तराखंड वार्तापत्र, श्रीराम जोशी : भाजपमधील बंडखोरांचा सुळसुळाट, 2017 च्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आसुसलेली काँग्रेस आणि वरील दोन्ही पक्षांना पर्याय देण्यास उत्सुक असलेली आम आदमी पार्टी अशा स्थितीत उत्तराखंड राज्यात यावेळी विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची बनली आहे. राज्यात कुमाऊ, गढवाल आणि तराई असे तीन प्रादेशिक भाग आहेत. यातील कुमाऊ आणि गढवाल हे भाग पहाडी आहेत. तराई भाग मैदानी प्रदेश आहे. गेल्या काही वर्षांत उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाचा झपाट्याने विस्तार झाला आहे. त्यातही तराई भागातला ‘आप’चा वाढता प्रभाव प्रस्थापित पक्षांसाठी म्हणजे भाजप आणि काँग्रेससाठी डोकेदुखीचा विषय ठरत चालला आहे.

कुमाऊ भागाचा विचार केला, तर या ठिकाणी विधानसभेच्या 20 जागा आहेत. या प्रांतात भाजपपेक्षा काँग्रेसचा जास्त जोर दिसत आहे. काँग्रेसला सर्वाधिक संख्याबळ मिळवून देणारा भाग म्हणून कुमाऊकडे पाहिले जात आहे. गढवाल भागात एकूण 30 जागा आहेत. येथे भाजप आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाकडून पहिल्यांदाच या भागात खाते उघडले जाऊ शकते. ‘आप’चा जोर ज्या भागात आहे, त्या तराई भागातील मतदारसंघांची संख्या 20 इतकी आहे. तराईमध्ये अनेक मोठी शहरे आहेत आणि या ठिकाणी अनेक मतदारसंघांत ‘आप’चे उमेदवार विजय खेचून आणण्याच्या स्थितीत आहेत. या भागात ‘आप’ला अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त झाले, तर सत्ताप्राप्तीसाठीचे काँग्रेस आणि भाजपचे गणित बिघडू शकते. त्यामुळे तराईमध्ये मतदार कुणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दिल्ली आणि पंजाबमध्ये मजबूत स्थितीत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अद्याप काँग्रेस आणि भाजपपासून समान अंतर राखले आहे. उत्तराखंडमधील सर्व तेरा जिल्ह्यांत पक्षाने संघटनेची बांधणी केली आहे. पक्षाचे पोस्टर्स आणि बॅनर्स तराईच नव्हे, तर पहाडी भागातही सर्वत्र दिसतात. माजी लष्करी अधिकारी असलेले अजय नौठीयाल हे ‘आप’ चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. 2013 मध्ये केदारनाथ येथे नैसर्गिक आपत्तीने प्रचंड नुकसान झाले. केदारनाथच्या पुनर्बांधणीत नौठीयाल यांचे मोठे योगदान आहे.

उत्तराखंडमध्ये माजी सैनिकांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्‍वभूमीवर नौठीयाल यांची लोकप्रियतादेखील बर्‍यापैकी आहे. आम आदमी पक्षाला आगामी निवडणुकीत याचा निश्‍चितपणे फायदा होणार आहे. नौठीयाल हे गंगोत्री मतदारसंघातून उभे आहेत. दररोज चार ते पाच गावांना भेटी देऊन त्यांनी प्रचार पूर्ण केला आहे. आता त्यांची नजर राज्यातील इतर मतदारसंघांतील प्रचारावर आहे. ‘आप’ हा हंगामी पक्ष नसून येथे आम्हाला कायमचे पाय रोवायचे आहेत, असे यूथ फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य करीत असलेल्या नौठीयाल यांचे म्हणणे आहे.

‘आप’ची डेहराडूनमध्ये वॉर रूम

आम आदमी पक्षाने डेहराडूनमध्ये वॉर रूम सुरू केली आहे. दिल्लीत स्थायिक असलेल्या उत्तराखंडच्या लोकांचीही मदत पक्षविस्तारासाठी घेतली जात आहे. दिल्लीतील विकासाचे मॉडेल तेथे स्थायिक असलेल्या उत्तराखंडवासीयांनी बघितलेले आहे आणि या मॉडेलचा लाभ आपल्या स्वतःच्या राज्याला व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यातून पक्षाचा व्याप वाढला असल्याचे नौठीयाल यांचे मत आहे. दिल्लीप्रमाणे सवलतीच्या दरात वीज आणि पाणी देणे, चांगले शिक्षण तसेच आरोग्य सेवा आणि रोजगार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे नौठीयाल प्रचार सभातून सांगत आहेत. नव्या मैदानावर नवे तंत्र… या धोरणानुसार आम आदमी पक्ष उत्तराखंडसाठी प्रस्थापित पक्षांपेक्षा वेगळे मॉडेल अंगीकारत आहे.

‘स्पिरिच्युएल हब’ म्हणून राज्याचा विकास करणे, सीमेवर किंवा लष्करी कारवाईत शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये भरपाई आदी आश्‍वासने हा त्याचाच भाग मानला जात आहे. संभाव्य मतदारांपर्यंत पक्षाने आपले कार्ड पोहोचवले आहे. स्थानिक समस्या सोडविण्यात आमचा पक्ष कुठेही मागे पडणार नाही, असेही ‘आप’चे नेते, कार्यकर्ते लोकांना पटवून देत आहेत. या सर्व मेहनतीचे फळ आपला मिळाल्यावाचून राहणार नाही, असा राज्यातील राजकीय पंडितांचा कयास आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button