गर्भश्रीमंत भाजपकडे ४ हजार ८४७ कोटी रुपयांची संपत्ती, काँग्रेसपेक्षाही मायावतींच्या बसपकडे बक्कळ 'माया' | पुढारी

गर्भश्रीमंत भाजपकडे ४ हजार ८४७ कोटी रुपयांची संपत्ती, काँग्रेसपेक्षाही मायावतींच्या बसपकडे बक्कळ 'माया'

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वर्ष २०१९ – २० सालासाठी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने ४ हजार ८४७ कोटी रुपयांची संपत्ती (political parties property) घोषित केली आहे. तर मायावती यांचा बसपा या यादीत ६९८ कोटींच्या संपत्तीसह दुसऱ्या आणि काँग्रेस ५८८ कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाबतची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस अर्थात एडीआर संस्थेकडून शुक्रवारी (दि. २८) देण्यात आली.

सात प्रमुख राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात आलेली संपत्ती (political parties property) ६ हजार ९८८ कोटी रुपयांची आहे तर ४४ प्रादेशिक पक्षांकडून जाहीर करण्यात आलेली संपत्ती २ हजार १२९ कोटी रुपये इतकी आहे. सात राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीच्या हिस्सेवारीचा विचार केला तर भाजपकडे ६९.३७ टक्के, बसपाकडे ९.९९ टक्के, काँग्रेसकडे ८.४२ टक्के इतकी संपत्ती आहे. ४४ प्रादेशिक पक्षांमधील पहिल्या दहा पक्षांकडे २ हजार २८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ही हिस्सेदारी ९५.२७ टक्के इतकी आहे.

प्रादेशिक पक्षांमध्ये समाजवादी पक्षाकडे सर्वाधिक ५६३ कोटी (२६.४६ टक्के) रुपयांची संपत्ती (political parties property) असून त्याखालोखाल चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसकडे ३०१.४७ कोटी, अण्णा द्रमुककडे २६७.६१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. प्रादेशिक पक्षांकडील घोषित संपत्तीमध्ये सर्वाधिक १६३९.५१ कोटी रुपयांचा वाटा बँकातील ठेवी आणि एफडीच्या रुपात आहे. भाजपची जमा ठेव व एफडी ३२५३ कोटींची असून बसपाची जमा ठेव व एफडी ६१८.८६ कोटी तर काँग्रेसची जमा ठेव / एफडी २४०.९० कोटी रुपयांची आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये जमा ठेव / एफडी असणाऱ्या प्रमुख पक्षांत सपा (४३४.२१ कोटी), टीआरएस (२५६ कोटी), अण्णा द्रमुक (२४७ कोटी), द्रमुक (१४८.४६ कोटी), शिवसेना (१४६.४६ कोटी), बिजू जनता दल (११८.४२) यांचा समावेश आहे.

Back to top button