मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ताडदेव आगीच्या दुर्घटनेला सर्वस्वी मुंबई महापालिका जबाबदार आहे. आतापर्यंत आगीत अनेक निष्पापांचे नाहक जीव गेले, आणखी किती निष्पाप मृत्यू महापालिकेला हवे आहेत? सोसायटी इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा किती सक्षम आहे, हे तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे ? असे सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी उपस्थित केले.
प्रवीण दरेकर यांनी ताडदेवमधील अग्निकांडग्रस्त कमला बिल्डिंगला भेट दिली. दुर्घटनेतील जखमींची भाटिया रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकार्यांशी चर्चा करून माहिती घेतली.
माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, महपालिका, पोलीस, अग्निशमन दल, बेस्ट या यंत्रणांशी समन्वय साधणारी यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मुंबईत सतत आगी लागत असून त्यात निष्पाप मुंबईकरांना जीव गमवावा लागत आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात आणि उपनगरातही लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना आवश्यक आहेत. त्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची मागणीही दरेकर यांनी केली.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख जाहीर केले म्हणजे महापालिका प्रशासन व राज्य सरकार यांची जबाबदारी संपत नाही. अशा दुर्घटना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. महापौरांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही दुर्घटना कोणामुळे घडली? आगीला कोण जबाबदार आहे. यावर भाष्य करणे अपेक्षित आहे. महापालिकेने झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची गरज आहे, असेही दरेकर म्हणाले.
सकाळी आग लागल्यानंतर जखमी रहिवाशांना उपचारासाठी काही रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. हे फार गंभीर आहे. रुग्णालयांच्या संवेदनाच मेल्या आहेत. असे प्रकार जर जाणीवपूर्वक घडले असतील तर विरोधी पक्ष म्हणून जाब विचारला जाईल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.
यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, नगरसेवक मिनल पटेल, मंडळ अध्यक्ष विनय अंतरकर, युवा मोर्चा अध्यक्ष सनी सानप आदी उपस्थित होते.
मुंबईत 223 बहुमजली इमारतींना नोटिसा
18 नोव्हेंबर 2021 ते 8 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये महानगरपालिकेने 223 बहुमजली उंच इमारतींचे परीक्षण करून त्यांना महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवन रक्षण उपाययोजना अधिनियम 2006 अंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. अग्निशमन उपाययोजना यंत्रणा व साधनांचे योग्य रीतीने परिरक्षण न करता त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या नोटिसा दिल्या आहेत.
अग्निशमन दलाची भीती खरी ठरली!
इमारतीला 2015मध्ये ओसी मिळाल्याची माहिती मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. याउलट इमारतीमधील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, 2004 सालीच इमारत बांधून तयार झाली होती. मात्र मालक आणि विकासक यांच्या वादामुळे रहिवाशांना घराचा ताबा 2014 साली मिळाला. त्याचवेळी इमारतीच्या शेजारी मोकळी जागा नसल्याने अग्निशमन दलाच्या गाडीस आत शिरकाव करता येणार नसल्याचे अग्निशमन दलाने निदर्शनास आणून दिले होते. तसेच भविष्यात आगीची दुर्घटना झाल्यास मोठी जीवितहानी होण्याबाबत सतर्क केले होते.
29 रहिवाशांना रुग्णालयात हलवले
महापालिका अधिकार्याने सांगितले की, आगीचा फोन आल्यानंतर अग्निशमन दल दुर्घटनास्थळी रवाना झाले. त्यावेळी 19व्या मजल्यावरून आग खाली पसरल्याचे दिसले. त्यावेळी बहुतेक रहिवाशांची सुटका केली, तर 29 लोकांना रुग्णालयात उपचारासाठी हलवले. त्यातील 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून सात रहिवाशांना उपचाराअंती घरी सोडले आहे. याशिवाय 16 रहिवासी अद्यापही उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल आहेत.
भय इथले संपत नाही
मार्च 2021 : भांडुपच्या ड्रिम्स मॉलमध्ये असलेल्या सनराईज हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता.
ऑक्टोबर 2021 : करीरोडला अविघ्नपार्क इमारतीत लागलेल्या आगीमध्ये अरुण तिवारी याचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला.
नोव्हेंबर 2021 : कांदिवलीतील हंसा हेरिटेज इमारतीमध्ये लागलेल्या आगीत 89 वर्षीय वयोवृद्धेसह 2 महिलांचा मृत्यू झाला.
नोव्हेंबर 2021 : वरळीतील बीडीडी चाळीत सिलिंडरचा स्फोट होऊन 4 महिन्यांच्या मुलासह त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला.