नाना पाटेकर म्हणाले, भावना दुखावतात म्हणून आम्ही मुके व्हायचे काय? | पुढारी

नाना पाटेकर म्हणाले, भावना दुखावतात म्हणून आम्ही मुके व्हायचे काय?

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : ‘आज काही झाले की प्रत्येकाच्या भावना दुखावतात. मग आता आम्ही काय मुके व्हायचे का?’ असा सवाल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वसंतोत्सवात झालेल्या मुलाखतीत उपस्थित केला. डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाच्या वतीने आयोजिलेल्या वसंतोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी समीरन वाळवेकर यांनी नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर रोखठोक मते मांडली.

‘आपल्याकडे काल काय झाले यावरच अधिक भर दिला जातो. आपल्याला भारतरत्न हे जयंती, पुण्यतिथीलाच आठवतात. आज महापुरुषांचे चबुतरे उखडले तर त्यात त्यांचे विचार गाडलेले दिसतील. तिथे उत्खनन करा आणि त्यांचे विचार बाहेर काढा. महापुरुषांनी केलेले काम नतमस्तक होण्यासारखेच आहे. अशा प्रकारचे समाजकार्य करण्यासाठी भूकच असावी लागते, असे नाना पाटेकर म्हणाले.

‘भारतरत्न’ पुरस्कार कुणाला दिला जायला हवा? उद्या मला दिला तर मी घेईन का? ‘भारतरत्न’ घेण्याची मुळात आपली लायकी आहे का, याचा विचार करायला हवा, याकडेही पाटेकर यांनी लक्ष वेधले. ‘ज्या व्यक्‍तिरेखा मला आवडल्या नाहीत, त्या मी कधी केल्या नाहीत. त्या केल्या असत्या तर झोप लागली नसती. तळमळत राहिलो असतो. खलनायकाच्या भूमिका करताना त्या संपूर्ण प्रक्रियेमधून जावे लागते, त्याचा त्रास होतो,’ असेही ते म्हणाले.

डॉ. कोल्हे यांनी नथूरामाचे समर्थन केले नाही

‘तीस वर्षांपूर्वी मी नथूराम गोडसेची भूमिका केली आहे, म्हणजे मी गोडसेचे समर्थन केले, असे होत नाही. भूमिका करणे हे माझ्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे मला ती भूमिका करावी लागली. खासदार अमोल कोल्हे यांनी कोणती भूमिका करावी, हा त्यांचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. जेव्हा एखादी व्यक्‍ती समर्थन करते, त्या वेळी तुम्ही त्याला प्रश्‍न विचारू शकता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे भांडवल करण्याची काही गरज नाही’, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्‍त केले.

Back to top button