uttar pradesh election : मायावतींच्या मौनात दडलयं तरी काय? काय आहे त्यामागे व्यूहरचना | पुढारी

uttar pradesh election : मायावतींच्या मौनात दडलयं तरी काय? काय आहे त्यामागे व्यूहरचना

ज्ञानेश्वर बिजले : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भुषविलेल्या मायावती यांनी त्यांच्या वाढदिवशी शनिवारी (ता. 15) निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 53 उमेदवारांची नावे जाहीर करीत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या राजकीय चालीवरच अन्य पक्षांनी गणिते अवलंबून असल्याने, त्यांच्या नव्या व्यूहरचनेचा अंदाज बांधण्यात प्रतिस्पर्धी पक्षाचे धुरीण व्यग्र झाले आहेत.

बसपचे बहुतेक आमदार पक्ष सोडून गेल्याने त्यांनी नव्या चेहर्यांना पसंती दिली आहे. गेले तीन-चार महिने उमेदवारांची निवड करण्याकडे त्यांचे लक्ष होते. बसप संपली, असा टाहो विरोधक आणि राजकीय विश्लेषक मांडत असले, तरी सलग निवडणुकांत वीस टक्क्यांचा आसपास मते घेणाऱया या पक्षाची दखल उत्तरप्रदेशातील राजकारणात घ्यावीच लागणार आहे. गेली तीन दशके या पक्षाने उत्तर प्रदेशात स्वतःचे स्थान निर्माण केले. दलित समुदायाचा पक्ष म्हणून देशपातळीवरही काही काळ वादळ निर्माण केले.

मायावतीच्या शांततेने विरोधक अस्वस्थ

मायावती या बहेनजी म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यात ओळखल्या जातात. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षाने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही महिलांना एकत्रित येण्याचे आवाहन करीत वेगळी व्यूहरचना मांडतानाच बसपच्या विरोधात मानल्या गेलेल्या वाल्मिकी समाजासह दलित समाजाला साद घातली. उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण गेले तीन महिने ढवळून निघालेले असताना, मायावती मात्र शांत होत्या. बसपतर्फे सतीशचंद्र मिश्रा यांनी ब्राह्मण संमेलन घेतले, तसेच पक्षाच्या मंडल पातळीवरील बैठका घेत, पक्षाच्या तयारीचा अंदाज घेतला. पण बसप सध्यातरी फारसा आक्रमक नसल्याने, कार्यकर्त्यात अस्वस्थता पसरली आहे.

बहेनजी कहा है, अशी विचारणा भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभेत केली. प्रियांका गांधी याही मायावती सक्रीय कधी होणार, याची विचारणा करीत होत्या. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेही बसपच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. याचे कारण बसपचे उमेदवार कोणत्या मतदारसंघात किती मते घेणार, यांवर त्या-त्या मतदारसंघातील जयपराजयाची गणिते मांडली जातील.

बसपची मतांवर पकड

बसपचे 2017 च्या निवडणुकीत 403 पैकी केवळ 19 आमदार निवडून आले. त्यातील केवळ तिघेजण सध्या पक्षासोबत आहेत. पंधराजण अन्य पक्षात गेले, तर एकाचे निधन झाले. त्यामुळे बसप संपला, असे काहीजण म्हणू शकतील. मात्र, कोणत्याही पक्षाची ताकद पाहताना, त्यावेळी त्यांना मिळालेली मतेही लक्षात घेतली पाहिजेत. 14 कोटी मतदारांपैकी आठ कोटी 67 लाख मतदारांनी (61.24 टक्के) मतदान केले होते. त्यापैकी एक कोटी 92 लाख मते (22.23 टक्के) बसपने मिळविली होती. भाजपने तीन कोटी 44 लाख मते, तर सपने 1.89 कोटी मते मिळविली होती. काँग्रेसच्या 105 उमेदवारांनी 54 लाख मते मिळविली होती. हे लक्षात घेतल्यास, बसप राज्यात दुसऱया क्रमांकावर होता.

गेल्या पंधरा वर्षाच्या निवडणुकीत बसपने 19 ते 30 टक्के दरम्यान मते घेतली आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी समाजवादी पक्षाची आघाडी केली आणि 19.4 टक्के मतांची नोंद करीत दहा खासदार निवडून आणले. त्या सर्व जागा त्यांनी भाजपकडून हिसकावून घेतल्या. त्यानंतर कोरोनाची साथच आली. त्यामुळे, बसपची शक्ती कमी झाली असे बोलले जात असले, तरी येत्या निवडणुकीत ते किमान दीड कोटींच्या आसपास मते  घेतील, यात फारशी शंका असण्याचे कारण नाही.

बसपचे राजकारण

बसपचे संस्थापक काशीराम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी 1984 मध्ये पक्षाची स्थापना केली. दलित समाजासोबतच त्यांनी इतर मागासवर्ग समाजाची मोट बांधत देशात पक्ष वाढविला. काशीराम यांनी मायावती यांना त्यांचे वारसदार म्हणून 2001 मध्ये घोषित केले. मायावती यांचा जन्म 15 जानेवारी 1956 रोजी दिल्लीत झाला. आज त्यांच्या वयाची 65 वर्षे पूर्ण झाली. बसप कधीही आंदोलनाची वाट चोखाळत नाही, तसेच प्रसिद्धीच्या मागेही धावत नाही. त्यामुळे ते शांत असल्याचे वरकरणी दिसून येते. मात्र, निवडणूक सुरू झाली, की त्यांचे केडर सक्रीय होते. गेल्या तीन दशकांत देशातील तेरा राज्यात त्यांच्या पक्षाचे आमदार, तसेच चार राज्यातून खासदार निवडून आले. उत्तर प्रदेशात 2007 मध्ये 30 टक्के मते मिळवित 206 जागा जिंकत बसपने स्वबळावर सत्ता मिळविली.

मायावती दलित आयकॉन

बाबरी मशीद पाडल्यानंतर 1993 मध्ये झालेल्या निवडणुकीत सप-बसपची आघाडी झाली. ते सत्तेवर आले. त्यावेळी मायावती 1995 मध्ये 137 दिवसांसाठी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. त्यावेळी त्या उत्तरप्रदेशातील सर्वांत तरूण मुख्यमंत्री, तसेच  राज्याच्या पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री ठरल्या. त्यानंतर, 1997 मध्ये 184 दिवसांसाठी, तर मे 2002 ते ऑगस्ट 2003 दरम्यान एक वर्ष 188 दिवसांसाठी भाजपच्या पाठिंब्याने त्या मुख्यमंत्री झाल्या. काशीराम यांचे 2006 मध्ये निधन झाल्यानंतर, मायावती यांनी  पक्षाची सुत्रे एकहाती राबवित बसपच्या राजकारणाला सोशल इंजिनीअरींगची नवी दिशा दिली. हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है, तसेच काशीरामका मिशन अधुरा, करेगी बहेन मायावती पुरा या दोन घोषणा त्यावेळी गाजल्या. बसपचे 206 आमदार निवडून आले. दलित, ओबीसी आणि ब्राह्मण अशी वेगळीच आघाडी त्यावेळी निर्माण झाली. सलग पाच वर्षे त्या मुख्यमंत्री पदी राहिल्या. सक्षम कारभार आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात कार्यक्षम असा त्यांचा लौकीक राहिला. उत्तरप्रदेशात आजपर्यंत सर्वांधिक काळ मुख्यमंत्री पद त्यांनी भूषविले. चार वेळचा त्यांचा मुख्यमंत्री पदाचा एकूण कार्यकाळ सात वर्षे सोळा दिवस एवढा राहिला. दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी मायावती यांचे वर्णन लोकशाहीतील चमत्कार असे केले होते.

बसपची घसरण

मायावती यांच्यावर सत्तेचा गैरवापर, जादा संपत्ती जमा केली असे आरोप त्या सत्तेवर असताना झाले होते. 2012 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना 25 टक्के मते मिळाली व तीस टक्के मते घेणाऱया सपची सत्ता आली. तोपर्यंत तिसऱया क्रमांकावर असलेल्या भाजपने उत्तरप्रदेशातील ध्रुवीकरण आणि सामाजिक विशेषतः यादव व्यतिरिक्त अन्य ओबीसी आणि जाटवव्यतिरिक्त अन्य दलित समाजाची मोट बांधत 2014 मध्ये 80 पैकी 73 खासदार निवडून आणले. बसपला 19.6 टक्के मते मिळूनदेखील त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यातच 2017 च्या निवडणुकीतही त्यांना दोन कोटीच्या आसपास मते मिळूनही केवळ 19 आमदार निवडून आले.

या काळात अन्य ओबीसी समाजाचे लोक बसपपासून दुरावले. ते भाजपमध्ये गेले. ब्राह्मण समाजही तिकडेच गेला. तर जाटव समाजाला पक्षात प्राधान्य मिळत असल्याने, अन्य दलित समाजही पक्षापासून दुरावला. त्यांची भाजपला साथ मिळाल्याने, भाजप राज्यात सत्तेवर आला. 2019 च्या निवडणुकीतही भाजपला हेच समीकरण उपयोगी ठरले. त्यांचे 64 खासदार निवडून आले. सप-बसपची युती झाल्याचे त्यांचे पंधरा खासदार विजयी झाले. त्यात बसपच्या दहा खासदारांचा समावेश आहे.

बसपमधून, तसेच भाजपमधून अनेकजण सध्या समाजवादी पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे अखिलेश यादव हेच सध्या भाजपला आव्हान देत आहेत, असे चित्र उत्तरप्रदेशात निर्माण झाले आहे.

या निवडणुकीत काय होणार

मायावती यांनी पक्षाच्या पहिल्या टप्प्यातील 53 उमेदवारांनी नावे जाहीर केली. दलितामध्ये मायावती यांच्या जाटव समाजाची संख्या उत्तरप्रदेशातील एकूण लोकसंख्येच्या एकूण 11 टक्के आहे. जाटव हे एकगठ्ठा बसपच्या पाठीमागे आहेत. त्यातच मुस्लीम, ब्राह्मण समाजांसह अन्य ओबीसीचे उमेदवार बसपने दिले आहेत. त्यामुळे त्या-त्या मतदारसंघातील लढती अटीतटीच्या ठरल्यास, निकालही अनपेक्षित लागतील.

पहिल्या दोन टप्प्यात 14 फेब्रुवारीपर्यंत पश्चिम उत्तरप्रदेशात निवडणूक होत असून, त्या भागात बसपचे तीन खासदार आहेत. त्यामुळे, तेथे पक्षाची निश्चित ताकद आहे. बुंदेलखंड आणि पूर्वांचलातही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे चांगले आहे. मतदानाच्या शेवटच्या दोन टप्प्यातील पूर्वांचलात बसपचे उर्वरीत सात खासदार आहेत. तेथेही बसपचे काहीजण निवडून येतील.

बसपची ताकद पूर्वीच्या तुलनेत घटली असली, तरी जाटव त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहेत. उत्तरप्रदेशात एकूण पंधरा कोटी मतदार असून, साठ टक्के मतदान झाले तरी नऊ कोटी मते होतील. त्यापैकी 15 टक्के मते जरी बसपला मिळाली, तरी तिरंगी लढतीत त्यांचे पंचवीस-तीस आमदार निवडून येतील. विधानसभा त्रिशंकू झाल्यास, बसपला महत्त्व मिळेल. यापूर्वी तीनदा सत्ता मिळविताना, याच स्थितीचा फायदा मायावती यांना झाला होता. त्यामुळे, यावेळीही त्या विशिष्ट मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत करून अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील, अशी शक्यता आहे.

हेही वाचलत का?

Back to top button