

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यातील मनमाड व येवल्याच्या ग्रामीण भागात रविवारी (दि. ७) झालेल्या अवकाळी पावसामुळे गारठ्यात वाढ झाली आहे. नाशिक शहर-परिसरात दुपारी काही काळ सूर्यनारायणाने दर्शन दिले असले तरी दिवसभर हवेत गारवा जाणवत होता.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात दाट धुक्यासह ढगाळ हवामान होते. त्यामध्येच रविवारी अवकाळीने हजेरी लावली. मनमाड शहरालगतच्या भागात तसेच येवला तालुक्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. त्यामुळे या भागातील पिके धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे अचानक आलेल्या पावसाचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिक शहराचा पारा १६.९ अंशांवर पोहोचला. सकाळी शहर धुक्यात हरवले. तसेच हवेतही गारवा असल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली.
निफाड, चांदवड, दिंडोरी या पट्ट्यात पहाटे दाट धुके पडत आहेत. निफाडचा पारा १५.४ अंशांवर स्थिरावला आहे. मात्र, धुके व थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षपिकांना धोका निर्माण होऊ शकताे. दरम्यान, अन्य तालुक्यांतही ढगाळ हवामानामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. पुढील काही दिवस हे वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा :