सोलापूर : सदाशिवनगर येथे लग्न सोहळ्यादरम्यान वधु-वराच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला | पुढारी

सोलापूर : सदाशिवनगर येथे लग्न सोहळ्यादरम्यान वधु-वराच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला

माळशिरस : पुढारी वृत्तसेवा : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथे मंगल कार्यालय या ठिकाणी नवरा नवरीचे अज्ञात चोरट्याने सहा लाखाचे दागिने पळवले. या चोरीनंतर शिवामृत भवनमध्ये एकच धांदल उडाली. दोन वधू वर यांचे सोने व चांदीचे दागिन्यांवल लग्न मुहूर्ताच्या अगोदरच अज्ञात चोरट्याने डल्ला मारला.

भारत बाजीराव कोळेकर (रा. जळभावी, ता. माळशिरस) यांचे द्वितीय चिरंजीव विनोद आणि उद्धव आप्पासो शेंडगे (रा. वाटलूज, ता. दौंड), यांची सुकन्या तृप्ती आणि श्री. भारत बाजीराव कोळेकर (रा. जळभावी, ता. माळशिरस) यांचा मुलगा विष्णू व सुरेश रामचंद्र वाघमोडे रा. बांगर्डे यांची मुलगी दीप्ती यांचा शुभविवाह सोहळा शिवामृत भवन मंगल कार्यालय, पुणे-पंढरपूर रोड, सदाशिवनगर येथे शनिवार दि. 06/01/2024 रोजी दुपारी 02 वाजून 35 मिनिटे या शुभमुहूर्तावर संपन्न होणार होता. नववधूंचे दागिने कोळेकर परिवार यांच्याकडे होते. त्यांनी नववधूंना सोन्याचे मंगळसूत्र, गंठण आदी दागिने, चांदीची जोडवी, पैंजण असे दागिने केलेले होते. नवरदेव यांना सोन्याच्या अंगठ्या असे सर्व दागदागिने असणारी पिशवी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने लंपास केलेली आहे. पिशवी गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शोधाशोध केली. परंतु, दागिने असणारी पिशवी हाती लागलेली नाही. अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेली आहे. माळशिरस पोलीस स्टेशन येथे महावीर लक्ष्मण कोळेकर रा. जळभावी यांनी फिर्यादी जबाब देऊन सदरच्या घटनेविषयी तक्रार दाखल केलेली आहे. भारतीय दंड संहिता 1960 कलम 379 प्रमाणे माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला आहे. सदरच्या गुन्ह्यांमध्ये सोने व चांदीचे दागिने एकूण 05 लाख 52 हजार 271 रुपये किमतीचे अज्ञात चोरट्याने लंपास केलेले आहेत. माळशिरस पोलीस स्टेशन सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Back to top button