Nashik News : राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन तपोवनात होणार तर समारोप…

Nashik News : राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन तपोवनात होणार तर समारोप…
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– येत्या १२ ते १६ जानेवारीदरम्यान शहरात होत असलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला असून, त्यामध्ये विभागांना महोत्सव यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या महोत्सवाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन मैदानावर होणार आहे आणि महोत्सवाच्या समारोपाचा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी या ठिकाणी होणार आहे.

महोत्सवात २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश यातील प्रत्येकी १०० युवांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे आठ हजार जण यात सहभागी होणार आहेत. महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समूह लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने यांचा समावेश असणार आहे.

महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती आहेत. त्याचबरोबर गृह, वित्त, महसूल, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, सांस्कृतिक कार्य, पर्यटन, शालेय शिक्षण या विविध विभागांचा सहभाग आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीस उदघाटन होणार आहे. महोत्सवात संबंधित राज्यातील क्रीडा विभागांचे अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांचा समावेश असणार आहे. त्यांच्या निवासासाठी शहरात जवळपास १५० हॉटेल्सची पाहणी करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास शासकीय विश्रामगृह, मुक्त व आरोग्य विद्यापीठाची विश्रामगृहे, मविप्रसह विविध शैक्षणिक संस्थांची वसतिगृहे यांचाही विचार केला जाणार असल्याची माहिती समितीमधील वरिष्ठ सदस्यांनी दिली.

ही असणार आहेत कार्यक्रमस्थळे

तपोवन मैदान : उदघाटन कार्यक्रम

उदोजी महाराज म्युझियम : यंग आर्टिस्ट कॅम्प, पोस्टर मेकिंग, स्टोरी रायटिंग

कालिदास कलामंदिर : सांघिक लोकनृत्य आणि वैयक्तिक लोकनृत्य

कालिदास कलामंदिर हॉल क्र १ : फोटोग्राफी स्पर्धा

कालिदास कलामंदिर हॉल क्र २ : डिक्लेमेशन आणि थिमॅटिक बेस प्रेझेंटेशन

रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड : सांघिक लोकगीत आणि वैयक्तिक लोकगीत

ठक्कर डोम आणि मैदान : सुविचार, युवा संमेलन, कल्चरल, युवा कृती, महाराष्ट्र यूथ एक्स्पो, फूड फेस्टिव्हल

अंजनेरी, ठक्कर डोम, केटीएचएम बोट क्लब, चांभारलेणी : साहसी उपक्रम

विभागीय क्रीडा संकुल : समारोप कार्यक्रम, पारंपरिक कला प्रकार उपक्रम

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news