नाशिक : मॅडम, पैसे घेऊन काय करू? माझ्या लेकीला न्याय द्या ओ…’ मृत मीनाच्या मातेने फोडला टाहो…

नाशिक : मॅडम, पैसे घेऊन काय करू? माझ्या लेकीला न्याय द्या ओ…’ मृत मीनाच्या मातेने फोडला टाहो…
Published on
Updated on

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मॅडम, पैसे घेऊन काय करू?.. माझी सोन्यासारखी लेक आणि नात गेली… आता त्यांना कुठे शोधू?.. मॅडम, पैसे नको… न्याय द्या… मॅडम, माझ्या लेकीला न्याय द्या ओ… असा टाहो, विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या मीना सोनवणेच्या आईने फाेडला. तिने नायब तहसीलदार दीपाली खेडेकर यांच्यासमोर आपले थरथरते हात जोडत आपल्या मुलीला व नातीला न्याय मिळवून देण्याची विनंती केली. त्या मातेच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा पाहून उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांनाही गहिवरून आले.

शहरातील गणेशनगर येथे राहणाऱ्या मीना सोनवणे व आकांक्षा रणशूर या माय-लेकींचा गच्चीवर पेरू तोडताना हातातील लोखंडी गजाचा उच्च दाबाच्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने रविवारी (दि. 6) मृत्यू झाला. निफाडच्या नायब तहसीलदार दीपाली खेडेकर, मंडल अधिकारी जी. डी. कुलकर्णी, तलाठी सागर शिर्के यांनी सोनवणे परिवाराची भेट घेऊन घटनेचा शासकीय पंचनामा केला.

मृत मीना सोनवणे या कष्टाळू महिला म्हणून सगळ्यांनाच परिचित होत्या, तर अधिकमासाचे वाण घेण्यासाठी त्यांची मुलगी आकांक्षा आपल्या पती व दोन मुलांसह माहेरी आली होती. मीना सोनवणे यांच्या मातोश्री शालिनी सोनपसारे या धक्क्यातून अजूनही सावरलेल्या नाहीत. अजूनही त्यांचा या घटनेवर विश्वास बसत नाही. सांत्वनाला येणाऱ्या आप्तस्वकीयांनाही काय बोलावे, हे सुचत नाही. सोनवणे, सोनपसारे आणि रणशूर हे तिन्ही परिवार या धक्क्यातून सावरलेले नाहीत. मीना सोनवणे यांच्या दोन बहिणी व एक भाऊ तसेच आकांक्षा रणशूर यांचे पती राहुल हे शून्यात नजर लावून बसलेले, तर आकांक्षा रणशूर यांच्या दोन लहाग्यांना आपली आई आता या जगात नाही, याची पुसटशीदेखील कल्पना नाही.

निफाडच्या नायब तहसीलदार दीपाली खेडेकर यांनी सोनवणे परिवाराची भेट घेतली. मृत मीना सोनवणे यांच्या आई शालिनी सोनपसारे यांनी त्यांच्यासमोरच टाहो फोडला. आम्हाला न्याय दया, आमच्या लेकीची आणि नातीची कोणतीही चूक नसताना त्यांना काळाने आमच्यापासून हिरावून नेले, आता शासनाच्या पैशाने आमची लेक आणि नात आम्हाला परत मिळणार नाही. मॅडम, आम्हाला न्याय द्या, अशी हात जोडून विनंती करताच खेडेकर याही गलबलून गेल्या.

दीपाली खेडेकर यांनी सोनवणे परिवाराला धीर देत, शासन तुमच्या पाठीशी असून, तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. या घटनेची सविस्तर माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेचा अहवाल सादर करणार आहे. सोनवणे व रणशूर परिवाराला महावितरण कंपनीकडून तातडीने मदत देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या वतीने निवेदन

सोनवणे व रणशूर परिवाराला आर्थिक मदत द्यावी, असे निवेदन ओझर शहर शिवसेनेच्या वतीने महावितरण कंपनीचे शाखा अभियंता शिंदे यांना देण्यात आले. यावेळी उपतालुकाप्रमुख प्रकाश महाले, विभागप्रमुख प्रशांत पगार, युवा सेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे, शहरप्रमुख नितीन काळे, राजेंद्र शिंदे, राहुल अहिरे, नरेंद्र थोरात आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news