पिंपरी-चिंचवड शहरात आय ड्रॉपचा तुटवडा | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहरात आय ड्रॉपचा तुटवडा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात डोळे आलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपैकी आय ड्रॉपचा तुटवडा जाणवत असून, दिवसाला मागणीनुसार केवळ पन्नास टक्केच आय ड्रॉपचा पुरवठा होत असल्याची माहिती औषध विक्रेत्यांनी दिली. राज्यभरात डोळे येण्याची साथ पसरत आहे. घराघरांत या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. संसर्गजन्य असल्याने हवेवाटे विषाणू पसरत असून कुटूंबातील एकाला याची बाधा झाल्यास संपूर्ण सदस्यांनाही या साथीची लागण होत आहे.

शहरात मोठ्या संख्येने यासाथीचे रुग्ण आढळून येत असल्याने यावरील औषध म्हणजे आय ड्रॉपची मागणी वाढली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने औषधांच्या दुकानात आय ड्रॉपचा तुटवडा जाणवत आहे. औषध दुकानदारांच्या विक्रेत्यांच्या मागणीनुसार औषधांचे होलसेल विक्रेते केवळ निम्म्याच औषधांचा पुरवठा करत आहेत.

शहरात दिवसाला केवळ एक हजार ड्रॉप

पिंपरी-चिंचवड शहरात डोळ्यांच्या साथीचे रुग्ण वाढल्याने आय ड्रॉपला मागणी वाढली आहे. परिणामी उत्पादक कंपन्यांवर अचानक ताण पडला आहे. शहरातील होलसेल डीलरकडून मेडिकल विक्रेत्यांना केवळ एक हजार अँटिबायोटिक ड्रॉपची विभागणी करण्यात येत आहे.

विक्रेत्यांची मागणी 100 तर मिळतात निम्मेच

शहरातील मेडिकल विक्रेत्यांकडून दिवसाला किमान 100 ड्रॉपची मागणी डीलरकडे होत आहे. मात्र तुटवड्यामुळे शहरातील प्रत्येक मेडिकलधारकांकडून नागरिकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी ड्रॉपचे वितरण समप्रमाणात करण्यात येते. दिवसाला प्रत्येक औषध विक्रेत्याला किमान 40 ते 50 ड्रॉप वितरीत करण्यात येत आहेत.

उत्पादक कंपन्यांवर पडला ताण

एकाच महिन्यात रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने नागरिकांची आय ड्रॉपची मागणी वाढली आहे. परिणामी त्या प्रमाणात साठा उपलब्ध नसल्याने तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्यांवर मोठा ताण पडला आहे.

प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री नाही

औषध विक्रेत्यांना परस्पर अँटिबायोटिक आय ड्रॉपची विक्री करता येणार नाही. त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असल्याचे आदेश मेडिकल असोसिएशनला देण्यात आले आहेत; तसेच नागरिकांनीही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेतलेली औषधे आपल्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात.

शहरात मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ वाढत आहे. त्यामुळे डोळ्यांसाठी वापरल्या जाणार्‍या औषधाची मागणीही वाढली आहे. त्या प्रमाणात उत्पादन नसल्याने पुरवठा होत नाही. परिणामी बाजारात आय ड्रॉपचा तुटवडा जाणवत आहे. सर्व मेडिकल विक्रेते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ड्रॉप देणे टाळत आहेत. आता ही साथ आटोक्यात येत आहे. तसेच कंपन्यांनीदेखील उत्पादन वाढविल्याने हा तुटवडा आता जाणवणार नाही.

-रवि पवार, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन.

हेही वाचा

माणसे कशीही जगतील; मात्र जनावरांचे काय?

नाशिक : अधिक मासानिमित्त ब्रह्मगिरी फेरी मार्ग फुलला

हिंगोली : गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना अटक

Back to top button