नाशिक : मनपाच्या सत्तेची चावी कुणाकडे?

नाशिक : मनपाच्या सत्तेची चावी कुणाकडे?
Published on
Updated on

नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा जाहीर झाल्याने निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास सर्वच पक्ष आणि त्यांचे सैनिक सज्ज झाले आहेत. खरे तर राज्यातील सत्ता बदलामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार्‍या निवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. कारण त्यातून जनतेचा कौल तर समजेल, शिवाय प्रत्येक पक्ष किती पाण्यात आहे, हेदेखील समोर येणार आहे. एकूणच महापालिकेच्या सत्तेची चावी कुणाकडे येणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पहिली पंचवार्षिक काँग्रेसने आपल्या हाती ठेवली होती. परंतु, ही किमया काँग्रेसला पुढे राखता आली नाही. त्यानंतर सत्तांतर घडत गेले. अपक्ष असूनही महापौरपदावर विराजमान झालेले उमेदवारही याच नाशिक महापालिकेने पाहिले असून, त्यानंतर शिवसेना, मनसे आणि सध्या भाजपच्या हाती सत्तेची चावी आहे. परंतु, येत्या निवडणुकीची ढाल कोण राखणार, यासाठी सर्वच पक्षांकडून आटापिटा केला जात आहे. त्यातही भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती निर्णायक ठरणार आहे.

नाशिक महापालिकेचा कारभार हा 7 नोव्हेंबर 1982 ते 8 मार्च 1992 असा 10 वर्षे प्रशासकाच्या हाती राहिला. त्यानंतर 1992 ला पहिली सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक झाली आणि पहिल्याच निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला महापालिकेत सत्ता मिळवता आली. महापालिकेच्या पहिल्या महापौरपदाचा मान (स्व.) शांतारामबापू वावरे यांना मिळाला. त्यानंतर (स्व.) उत्तमराव ढिकले, (स्व.) पंडितराव खैरे आणि प्रकाश मते यांच्याकडे महापौरपदाची सूत्रे गेली. 1997 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे वसंत गिते 23 अपक्षांच्या पाठिंब्याने महापौर झाले. त्यावेळी गणपतराव (नाना) काठे, मनीष बस्ते, अशोक दिवे या अपक्ष उमेदवारांचे शिवसेनेला सहकार्य मिळाले होते. त्यानंतर आरक्षण पडल्याने पुढचे महापौरपद अशोक दिवे यांच्या गळ्यात पडले. एक-एक वर्ष महापौरपदाच्या कालावधीची मुदत याच काळात वाढून अडीच वर्षे झाली आणि त्याच्या मानकरी ठरल्या काँग्रेसच्या डॉ. शोभाताई बच्छाव.

1997 नंतर 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपला करिश्मा दाखवत युतीचा भगवा नाशिक महापालिकेवर फडकवला. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार पहिले महापौर शिवसेनेचे दशरथ पाटील, तर नंतरची अडीच वर्षे भाजपचे बाळासाहेब सानप हे महापौरपदी विराजमान झाले. त्यानंतरही युतीचा नाशिक शहरात वरचष्मा कायम राहिला. 2007 मध्ये झालेल्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्याने शिवसेनेने चाल खेळत अपक्षांचा आधार घेत, आपलाच उमेदवार महापौरपदी बसवला. म्हणजे या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे विनायक पांडे आणि त्यानंतर नयना घोलप असे सलग दोन महापौर राहिले. युती असूनही भाजपला अजय बोरस्ते आणि देवयानी फरांदे यांच्या रूपाने उपमहापौरपद मिळाले होते. खरे तर राजकीय रणनीती आणि संख्याबळ यामुळे भाजपला त्यावेळी काहीशा अपयशाचा सामना करावा लागला. युती असूनही महापालिकेचा कारभार नीट हाकता न आल्याने नंतरच्या निवडणुकीत मतदारांनी शिवसेना आणि भाजप यांना घरचा रस्ता दाखवत, मनसेचे राज ठाकरे यांच्या पदरी भरघोस मतदान टाकत, तब्बल 40 जागा निवडून दिल्या. खरे तर या निवडणुकीपर्यंत एकाही पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा नाशिककरांनी कधीच दिल्या नाहीत. मनसेला अडीच वर्षे भाजप, तर त्यानंतरच्या अडीच वर्षांच्या सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला. सलग पाच वर्षे सत्तेत राहूनही मनसैनिकांना गड राखता आला नाही. राज ठाकरे यांचे दुर्लक्ष आणि मनसेतील गटबाजी यामुळे मनसेला पुढच्या निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये आपले बस्तान सांभाळता आले नाही.

निवडणुकीपूर्वीच मनसेच्या जहाजातून अनेकांनी भाजप, शिवसेनेकडे मोर्चा वळवला. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मनसेच्याही पुढे जात तब्बल 66 जागा पटकावत एकहाती सत्ता राखली. याच एकहाती सत्तेचा भाजपला सत्तेसाठी पुरेपूर लाभ करून घेता आला नाही. केवळ स्वत:चा फायदा कसा होईल, असाच प्रयत्न भाजपकडून झाल्याचे दिसून येते.

सत्ताधार्‍यांसमोर
विरोधकांचे लोटांगण
वरिष्ठांनी केलेले दुर्लक्ष आणि अंतर्गत गटबाजी यामुळे भाजपला येत्या निवडणुकीत काही परिणामांना सामोरे जावे लागणार आहे, तर दुसरीकडे भाजप हा प्रमुख प्रतिस्पर्धी असूनही, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी नाशिक महापालिकेत मात्र जणू सत्ताधारी भाजपच्या पायी लोटांगणच घातल्याचे चित्र पाचही वर्षे पाहावयास मिळाले. अनेक बाबींमध्ये झालेल्या भागीदारी व्यवहारांमुळे निवडणुकीच्या काळात विरोधक खाल्ल्या मिठाला जागणार की, भाजपला आव्हान देणार, असा प्रश्न आहे. राहता राहिला प्रश्न मनसेचा, तर मनसेनेदेखील एक संघटन म्हणून कधीही भाजपच्या अव्यवहार्य निर्णयांना कडाडून विरोध केल्याचे पाहावयास मिळाले नाही. त्यामुळे सगळे एकाच माळेचे मणी असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकूणच 2022 या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. कारण एकीकडे शहरात भाजपने अनेक प्रकल्पांचा राबता उभा केला आहे, तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीचे आव्हान पाहता, ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी गेमचेंजर ठरू शकते, असे म्हणणे उचित ठरेल.

 – ज्ञानेेश्वर वाघ 

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news