

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना निलंबित केल्यानंतर रिक्त झालेल्या महापालिका शिक्षणाधिकारीपदी बी. टी. पाटील यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात आली आहे. हे पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त असल्याने मनपाच्या शिक्षण विभागाचा कार्यभार वाऱ्यावर असल्याचे चित्र होते. दरम्यान, बुधवारी (दि. २८) ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
दि. १५ जून रोजी शाळा सुरू होण्याच्या काळातच ही कारवाई झाल्याने शासनाचे धोरण, निर्णय राबविणे, शाळांचे, शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे प्रश्न सोडविणे याकामी अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, आता बी. टी. पाटील यांची शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाल्याने प्राधान्याने प्रश्न सोडविले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुनीता धनगर यांना निलंबित करण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मिता चव्हाण यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली होती. दरम्यान, शहरातील मनपाच्या १०० पैकी ६९ शाळांची प्राधान्याने डागडुजी करण्याची गरज असून, त्यादृष्टीने नव्या शिक्षणाधिकारी निर्णय घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. सुनीता धनगर यांच्या लाचखोरीमुळे अगोदरच मनपाच्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. अशात बी. टी. पाटील यांच्यावर मनपा शिक्षण विभागाची प्रतिमा सुधारण्याचीदेखील मोठी जबाबदारी असणार आहे.