Narges Mohammadi : महिलांच्या हक्कांसाठी यातनांचा एक प्रवास; जुळ्या लेकरांना ८ वर्षांपूर्वी शेवटचे पाहिले

Narges Mohammadi : महिलांच्या हक्कांसाठी यातनांचा एक प्रवास; जुळ्या लेकरांना ८ वर्षांपूर्वी शेवटचे पाहिले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नर्गिस मोहम्मदी ( Narges Mohammadi ) यांना मिळालेले नोबेल पारितोषिक ( Nobel Peace Prize)  हक्कांच्या आवाजाला मिळालेले बळ आहे. अर्थात, नर्गिससारखे कितीतरी आवाज इराण सरकारने दाबून, दडपून टाकलेले आहेत. इराण आधुनिक देश म्हणून नावारूपाला येत असतानाच आयातुल्लाह खोमैनी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामिक क्रांती यशस्वी झाली आणि हा देश पुन्हा अनेक शतकांनी मागे जायला सुरुवात झाली.

संबंधित बातम्या 

महिलांचे डोक्यावरील केस दिसले तरी रस्त्यावरून उचलून तुरुंगात रवानगी होऊ लागली. याविरोधात उठलेला बुलंद आवाज म्हणजे नर्गिस मोहम्मदी ! नर्गिस यांना सरकारविरोधी भूमिकेची मोठी किंमतही चुकवावी लागली. त्यांनी ८ वर्षांपूर्वी आपल्या मुलांना शेवटचे पाहिलेले आहे.

  सार्वजनिकरीत्या चाबकाचे १५४ फटके मारले

नर्गिस सध्या इराणमधील अत्यंत कडक अशा इविन कारागृहात आहेत. येथूनही महिलांच्या हक्काची लढाई त्यांनी सुरूच ठेवलेली आहे. सध्याची शिक्षा भोगत असण्यापूर्वी आजवर नर्गिस यांना १३ वेळा अटक झाली आहे. पाच खटल्यांत त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. सार्वजनिकरीत्या त्यांना चाबकाचे १५४ फटकेही मारण्यात आले आहेत.

Narges Mohammadi : आंदोलकांना तुरुंगातूनही प्रोत्साहित केले

इराणमध्ये सप्टेंबर २०२२ मध्ये महसा आमिनी या तरुण कुर्दिश युवतीला केस मोकळे ठेवल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. नंतर तिचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेने महिला हक्कांचा लढा इराणमध्ये अधिकच तीव्र बनला. नर्गिस यांनी आंदोलकांना तुरुंगातूनही प्रोत्साहित केले. लाखो इराणी तरुणही महिलांच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. तेहरानमधील या तुरुंगाच्या अभेद्य भिंती भेदून नर्गिस यांचा आवाज देशभरात दुमदुमला होता.

नर्गिस मोहम्मदी हेच या आंदोलनातील सर्वांचे प्रेरणास्थान होते. आजवर ५०० वर निदर्शक या आंदोलनात मरण पावले आहेत. २० हजारांवर लोकांना अटक करण्यात आली आहे; पण ८ वर्षांपासून त्यांची तुरुंगात डांबून नर्गिस यांचे शरीर कैद केले असले, तरी त्यांच्या स्वातंत्र्याचा हुंकार हे सरकार दडपून टाकू शकले नाही.

डिफेंडर ऑफ ह्यूमन राईट सेंटरच्या उपाध्यक्षा 

नर्गिस या डिफेंडर ऑफ ह्यूमन राईट सेंटरच्या आजही उपाध्यक्षा आहेत. शिरिन एबादी यांनी ही संघटना स्थापन केली होती. त्यांनाही २००३ मध्ये शांततेचे नोबेल देण्यात आले होते. १९९० मध्ये न्यूक्लिअर फिजिक्सच्या विद्यार्थिनी असतानाच नर्गिस या महिला हक्क चळवळीत सक्रिय झाल्या होत्या. न्यूयॉर्क टाईम्समध्ये महसा अमिनीच्या मृत्यूवर नर्गिस यांनी तुरुंगातून लिहिलेला लेख प्रकाशित झाला होता. आमच्यातील जितक्या अधिक लोकांना ते तुरुंगात डांबतील, तितके आम्ही अधिक मजबूत होत जाऊ, असा या लेखाचा आशय होता.

नर्गिस तुरुंगात असूनही चालू वर्षात त्यांच्याविरोधात नवी ३ प्रकरणे सरकारने दाखल केली आहेत. नर्गिस यांचे पती तगी रहमानी (वय ६३) यांनीही १४ वर्षे इराणच्या कारागृहात काढली आहेत. आपल्या जुळ्या मुलांसह (अली आणि कियाना) ते सध्या फ्रान्समध्ये आहेत. आपल्या या मुलांना भेटून नर्गिस यांना ८ वर्षे उलटली आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news