

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिर्डी दौऱ्यात जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता; पण या टीकेवर शरद पवार काय म्हणणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आज (दि.२८) माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. (Narendra Modi vs Sharad Pawar)
माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी २००४ ते २०१४ या कार्यकाळातील कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयाचे वाचन केले. ते म्हणाले की, "पंतप्रधान पद हे एक संवैधानिक पद आहे. या पदाची प्रतिष्ठा राखायला हवी. २००७ ते २०१४ या काळात माझ्याकडे देशाच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी होती. २००४ ला देशात अन्नधान्याची टंचाई होती. माझ्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव वाढला. माझ्या काळात शेतकऱ्यांच अन्नधान्य उत्पादन वाढलं. माझ्या काळातील दोन योजनांनी कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला. कृषी क्षेत्रासह मत्स्यपालनाकडे विशेष लक्ष दिलं.मत्स्यपालनव्यवसायासाठी वेगळ्या महामंडळाची स्थापना केली. तांदळाच्या उत्पादनात भारत अव्वल आला. त्याचबरोबर गहु उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानी होता. तांदुळ आणि गहु उत्पादनात देशाचा नावलौकीक झाला. शेतकरी जीवन संपवायचे, ही समस्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. अनेक कृषी योजना सुरु केल्या."