

नंदुरबार ; योगेंद्र जोशी : 46 अंशाच्या जवळपास गेलेले जिल्ह्यातील तापमान आज 44.8 अंश सेल्सिअसवर आले. या हंगामातील सर्वोच्च तापमानाची म्हणजे 45.8 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद काल 10 मे रोजी झाली होती. जराही वाढ झाली असती तर, नंदुरबारच्या तापमानाने प्रथमच 46 अंश सेल्सिअसची पातळी गाठली असती.
दरम्यान, कमालीच्या घटलेल्या तापमानामुळे हिमवृष्टी सदृश्य स्थिती देखील याच नंदुरबार जिल्ह्याने हिवाळ्यात अनुभवली होती आणि आता 46 अंश सेल्सिअसची जीवघेणी अति उष्णता अनुभवत आहे. नंदुरबार जिल्ह्यालगत पहाड पट्टी असताना होणारे हे वातावरणीय बदल लक्षणीय मानले जात असून अभ्यासकांनी आवर्जून दखल घ्यावे, असे आहेत.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला पहाड आणि जंगल जमिनीमुळे एरवी कधी वाढत्या तापमानाच्या इतक्या झळा बसलेल्या नाहीत; परंतु मागील काही वर्षात ग्लोबल वार्मिंगच्या परिणामांना नंदुरबार जिल्हाही अपवाद राहिलेला नाही; असे सातत्याने पाहायला मिळत आहे. अत्यंत कोरडे हवामान, त्वचेला चटका देणारे प्रचंड उन आणि भाजून काढणाऱ्या ऊन झळा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आठवडाभरापासून हे असे भाजून काढणारे वातावरण असल्याने लोक पार वैतागले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने सूर्य जणू आग ओकत आहे. डोक्यावर टोपी, कानावर, चेहऱ्यावर रुमाल आणि डोळ्यांवर गॉगल चढवून सुद्धा ऊन झळांचा त्रास जाणवतो. परिणामी बाजारपेठेत आणि रस्त्यांवर दुपारच्यावेळी रहदारी पूर्णत: रोडावलेली असते.
आजचे कमाल तापमान नंदुरबार येथील कोळदा कृषि विज्ञान केंद्राने 44.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. कालचे कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअस होते. यंदाच्या हंगामातील हे सर्वोच्च तापमान आहे. जनजीवनावर याचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात 2 मे पासून 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमान होते. नंतर ते वाढत गेले. 9 मे पासून 45 अंशाच्या आसपास आहे.
आधी या हंगामातील पहिले सर्वाधिक तापमान एप्रिल महिन्यात नोंदवले गेले होते. 18 एप्रिलला कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअस होते. नंतर सलग 42 अंश राहिले. 27 एप्रिलला ४४.३ अंश सेल्सिअस आणि नंतर 28 एप्रिलला ४५.२ अंश सेल्सिअस ईतके या हंगामातील सर्वोच्च तापमान नोंदवले गेले होते. मात्र मागील चार दिवसात सलग वाढ होऊन तापमानाने त्याहून अधिक पातळी गाठली. मागील चार दिवसात 44.6, 44.8, 45.8 आणि आज 44.8 अशा क्रमाने उच्च तापमान अनुभवायला मिळाले.
विशेष असे की, कमालीच्या घटलेल्या तापमानामुळे हिमवृष्टी सदृश्य स्थिती देखील याच नंदुरबार जिल्ह्याने अनुभवली होती. हिवाळा होता त्याप्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्याच्या दूर्गमभागात 4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. ती सर्वात मोठी लक्षवेधी घटना ठरली होती. त्यावेळी गवतावर, शेतातील पिकावर, घराबाहेरील पाण्यावर काचेवर गोठलेले दव बिंदू आणि बर्फाचे पातळ थर जमा झालेले दिसून आले होते. कधी 6 तर कधी 9 अंश सेल्सियस पर्यंत घसरले होते. अशा प्रकारे नंदुरबार जिल्हा अति उष्णता आणि अति गारवा असे दोन टोकाचे वातावरणीय बदल अनुभवत असून अभ्यासकांसाठी हे एक वेगळे आव्हान आहे.
हे ही वाचलं का ?