

जळगाव : भुसावळ शहरातील गुन्हेगारी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील वांजोळा रोड भागात दुहेरी खूनाची (Murder) घटना उघडकीस आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह वयोवृध्द आईची हत्या केली असून, त्याचा शालक या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. आज (दि. २३) पहाटे चारच्या सुमारास हे कृत्य घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील शगुन इस्टेट येथील रहिवासी हेमंत कुमार भूषण हा रेल्वेत नोकरीला आहे. मध्यरात्री त्याचे आपली आई आणि पत्नीसोबत भांडण झाले. यावेळी त्याने संतापाच्या भरात आई सुशीलादेवी (वय ६०) आणि पत्नी आराध्य हेमंत कुमार भूषण (वय २४) यांना लोखंडी तव्याने मारहाण करुन हत्या (Murder) केली. याप्रसंगी त्याच्या घरी आलेल्या शालकाने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेमंत हा रेल्वे कर्मचारी असून अलीकडेच त्याचा विवाह झाला होता.
पोलिसांची घटनास्थळी धाव…
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि मंगेश गोंटला, हरिष भोये यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पाहणी करुन तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :