

पिंपरी : मोहननगर येथील श्री तुळजाभवानी मंदिरासमोर पाण्याची पाईपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. यामुळे मोहननगर व महात्मा फुलेनगर या भागातला पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणीटंचाई आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांनी अधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची सर्वच ठिकाणी समस्या आहे, असे उत्तर मिळते.
तर, दुसरीकडे पाणीगळती आणि पाईपलाइन फुटल्याने शहरात दिवसाला हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मोहननगर येथील पाण्याची पाईपलाइन फुटल्यानंतर त्या परिसरातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. दुरुस्तीनंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. शहरामध्ये ड्रेनज लाइन, गॅस वाहिनी, केबल अशा कामांसाठी खोदकामे सुरु आहेत. जेसीबीव्दारे हे खोदकाम करताना पाईपलाइन फुटण्याच्या घटना घडत आहेत. दोन दिवसापूर्वी लिंकरोडवरील देवधर सोसायटी याठिकाणी खोदकामच्यावेळी पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी झाली. शहरातील इतर ठिकाणी व्हॉल्वमधून पाण्याची गळती होत आहे. याकडे महापलिकेचे दुर्लक्ष होत आहे.