वासरावर बिबट्याचा हल्ला, मांढर खोर्‍यात बिबट्याची दहशत; परिसरात भीतीचे वातावरण | पुढारी

वासरावर बिबट्याचा हल्ला, मांढर खोर्‍यात बिबट्याची दहशत; परिसरात भीतीचे वातावरण

परिंचे, पुढारी वृत्तसेवा: दक्षिण पुरंदरमधील मांढर (ता. पुरंदर) खोर्‍यात बिबट्याचे अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना दर्शन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण मांढर खोर्‍यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच मांढरगावच्या शिवारात दत्तात्रय खोमणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा केल्याचे वनरक्षक परमेश्वर वाघमारे यांनी सांगितले.

मांढर येथील खोमणे वस्ती येथील दत्तात्रय खोमणे व सत्यवान खोमणे यांच्या गोठ्यात सोमवारी (दि. 6) रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करून एक वर्षे वयाच्या वासरावर हल्ला केला. वासराचा व गोठ्यात बांधलेल्या इतर जनावरांचा आवाज ऐकून गोठ्याचे मालक दत्तात्रय खोमणे यांना बिबट्याने वासराला पकडले असल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करून इतर लोक जमा केले व बिबट्याला हुसकावून लावले. ही घटना वनविभागाला कळताच घटनास्थळाची अधिकार्‍यांनी पाहणी केली.

पिंपरी: चिखलीतील रस्तेदुरुस्तीला सुरुवात

या घटनेमुळे बिबट्याची पुन्हा एकदा या परिसरात दहशत निर्माण झाली असून शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष तानाजी शिर्के यांनी या वेळी सांगितले. या वेळी माजी पोलिस पाटील बबन खोमणे, रामदास खोमणे, माजी सरपंच प्रदीप खोमणे, मंगेश पापळ व अनेक शेतकरी उपस्थित होते. दरम्यान वनक्षेत्रालगत गोठा असल्याने या ठिकाणी बिबट्या आल्याची शक्यता असल्याचे वनरक्षक परमेश्वर वाघमारे व गणेश तांबे यांनी सांगितले.

Back to top button