पुढारी ऑनलाईन: एमपीएसीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे. आयोगाकडून नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून पुण्यात आंदोलन सुरू होते. आता राज्य लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांकडून झाशीची राणी चौकात जल्लोष साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने याबाबतचा आपला निर्णय ट्वीट करून जाहीर केला. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी आणि कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती तसेच उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त वेळ विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
20 फेब्रुवारी पासून पुण्यात लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु होते. गेल्या काही दिवसांमधील हे तिसरे आंदोलन होते. जानेवारी महिन्यात विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत राज्य सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. परंतु, हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले होते.