

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीने त्रस्त आहे. याचा फटना संघाला बसला आहे. दुखापतीमुळे अगामी टी-20 विश्वचषकातील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा स्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजीची धार कमकुवत झाल्याचे चित्र आहे. यावर माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन (shane watson) याने देखील चिंता व्यक्त करत बुमराहची कमतरता भारतीय संघाला भेदसावणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बुमराह जर विश्वचषक स्पर्धेसाठी तंदुरुस्त नसेल तर त्याच्या जागी मोहम्मद सिराज स्थान द्यावे असेही मत त्याने मांडले आहे.
वॉटसन म्हणाला, 'टीम इंडियाची बॅटींग लाईनअप चांगली आहे. त्यांच्याकडे तगडे फलंदाजे आहेत. ते ऑस्ट्रेलियन परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकतात आणि मोठी धावसंख्या उभारण्यासाठी सक्षम आहेत. परंतु सर्वात मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या वेगवान गोलंदाजीबाबत आहे, अशी चिंता त्याने व्यक्त केली आहे.
स्पिनर अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल हे जगातील कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकतात. पण वेगवान गोलंदाजी बाबत बोलायचे झाल्यास भारतीय गोलंदाज बुमराहशिवाय शेवटच्या षटकांमध्ये दबावाच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकतील का? असा प्रश्न निर्माण होतो. भारताच्या या कमकुवतपणाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ करेल यात शंका नाही. ही खरोखरच चिंतेची बाब आहे. त्यामुळे बुमराहच्या अनुपस्थितीत भारताला एका वेगवान गोलंदाजाची गरज आहे, जो 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकेल. यात सिराज हा एक चांगला पर्याय आहे, वॉट्सनने सुचवले आहे.