

पुढारी ऑनलाईन डेस्क : RSWS Final 2022 : इंडिया लीजेंड्स संघाने सलग दुसऱ्यांदा रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे विजेतेपद पटकावले. शनिवारी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील विजेतेपदाच्या सामन्यात इंडिया लिजेंड्सने श्रीलंका लिजेंड्सचा 33 धावांनी पराभव केला. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नमन ओझाच्या शतकी खेळीच्या जोरावर इंडिया लिजेंड्स संघाने 195 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंका लिजेंड्सचा डाव 18.5 षटकांत 162 धावांत गारद झाला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंडिया लिजेंड्सकडून मिळालेल्या 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंका लिजेंड्सची सुरुवात चांगली झाली नाही. तिस-या षटकात सनथ जयसूर्या आणि दिलशान मुनावीरा ही सलामीची जोडी 16 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर श्रीलंकेचा संघ या धक्क्यातून सावरू शकला नाही आणि ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. कर्णधार तिलकरत्ने दिलशान (11) आणि उपुल थरंगा (10) हेही फार काळ टिकू शकले नाहीत. काही क्षणांतच श्रीलंकेचे सहा खेळाडू 85 धावांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतले.
एका टप्प्यावर श्रीलंका लाजिरवाण्या पराभवाकडे वाटचाल करत होती पण इशान जयरत्ने (51) आणि महेला उदावत्ते (26) यांनी सातव्या विकेटसाठी 32 चेंडूत 63 धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात कमबॅक करून दिले. दोघांनीही वेगवान धावा केल्या. पण विनय कुमार आणि अभिमन्यू मिथुन यांनी दोघांनाही बाद केले आणि नंतर तळातील फलंदाज स्वस्तात माघारी परतले. याचबरोबर श्रीलंकेचा संपूर्ण संघ 162 धावांत गारद झाला. श्रीलंकेकडून इशान जयरत्नेने सर्वाधिक 51 धावा केल्या. त्याने 22 चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी विनय कुमारने इंडिया लिजेंड्सकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, इंडिया लिजेंड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय सुरुवातीला संघासाठी योग्य ठरला नाही आणि तो पहिल्याच षटकात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. सुरेश रैनानेही निराशाजनक कामगिरी केली. तो सुद्धा लगेच बाद झाला. लागोपाठ दोन विकेट्स गमावल्याने इंडिया लिजेंड्स संघ अडचणीत सापडला. पण सेमीफायनलमध्ये 90 धावा करणाऱ्या नमन ओझाने त्याचा फॉर्म कायम ठेवत पुन्हा एकदा चमकदार खेळी साकारात अर्धशतक पूर्ण केले.
नमन ओझाने विनय कुमारसोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. विनय 12व्या षटकात 21 चेंडूत 36 धावा काढून बाद झाला. यानंतर युवराज सिंग (19) आणि इरफान पठाण (11) धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, दुसऱ्या टोकाला नमनने टीच्चून फलंदाजी करत आपले पहिले शतक पूर्ण केले. नमन 71 चेंडूत 108 धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने 15 चौकार आणि दोन षटकार मारले. तर स्टुअर्ट बिन्नीने दोन चेंडूत 8 धावा करत संघाची धावसंख्या 195 पर्यंत नेली. श्रीलंकेकडून नुवान कुलसेकराने सर्वाधिक तीन बळी घेतले.