

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mitchell Starc World Cup : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने विश्वचषक 2023 मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. भारताविरुद्ध 200 धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना स्टार्कने डावाच्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशान किशनला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले. ईशान गोल्डन डक ठरला. भारतीय फलंदाजाची ही विकेट घेताच स्टार्क वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात वेगवान 50 बळी घेणारा गोलंदाज बनला.
विश्वचषकात पदार्पण करणारा इशान किशन पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. शुबमन गिल आजारी असल्याने या डावखु-या फलंदाजाला सलामी फलंदाज म्हणून कर्णधार रोहितने संघात स्थान दिले. पण त्याने निराशा केली. कांगारूंचा अनुभवी फलंदाज स्टार्कच्या गोलंदाजीचा सामना करताना बाहेर जाणाऱ्या चेंडूवर इशानने खराब शॉट खेळला. यावेळी चेंडू बॅटचे कडा घेऊन स्लीप गेला, जिथे कॅमेरून ग्रीनने झेल पकडला. याचबरोबर इशानला तंबूत परतावे लागले. (Mitchell Starc World Cup)
स्टार्कने 19 व्या सामन्यात वर्ल्डकपमधील बळींचे अर्धशतक पूर्ण केले आहे. स्टार्कने अवघ्या 941 चेंडूत हा आकडा गाठला. यासह त्याने 6 सामन्यांच्या मोठ्या फरकाने श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडीत काढला. मलिंगाने विश्वचषकात खेळल्या गेलेल्या 25 सामन्यात 50 बळी घेतले होते. ज्यासाठी त्याने 1187 चेंडू टाकले होते. या यादीत ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी विश्वचषकातील 30-30 सामन्यांमध्ये 50-50 विकेट्स घेतल्या होत्या. तर पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रम चौथ्या क्रमांकावर आहे. त्याला 50 फलंदाज बाद करण्यासाठी 33 सामने लागले होते. (Mitchell Starc World Cup)
19 डाव (941 चेंडू) : मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
25 डाव (1187 चेंडू) : लसिथ मलिंगा (श्रीलंका)
30 डाव (1540 चेंडू) : ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
30 डाव (1562 चेंडू) : मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
33 डाव (1748 चेंडू) : वसीम अक्रम (पाकिस्तान)
स्टार्कने वर्ल्ड कपमध्ये खेळल्या गेलेल्या 19 सामन्यांच्या 19 डावांमध्ये 14.60 च्या सरासरीने आणि 18.9 च्या स्ट्राइक रेटने 50 विकेट्स पूर्ण केल्या. या कालावधीत त्यांची इकॉनॉमी 4.61 राहिली. 28 धावांत 6 बळी ही स्टार्कची सर्वोत्तम कामगिरी आहे. स्टार्कने वर्ल्डकपमध्ये तीनदा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. वर्ल्डकपच्या प्रत्येक सामन्यात किमान एक तरी विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. 2015 मध्ये कांगारूंनी विश्वचषक जिंकल्यानंतर स्टार्कला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते.