

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात लवकरच वाढ होणार आहे. राज्य सरकार या संदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवारी (दि.२१) विधानसभेत दिली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला ते उत्तर देत होते.
यासोबतच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याचा सरकारचा विचार असून बचत गटाच्या माध्यमातून ठिकठिकाणी विक्री केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. विधानसभेत सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, महिला व बाल विकास, नगर विकास विभागाच्या पुरवणी मागण्या संमत करण्यात आल्या. या चर्चेत अनेक सदस्यांनी भाग घेतला. मात्र, 52 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जात असताना विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. त्यांचे नाव देखील घेतले जात नाही. विरोधकांना बेदखल करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.. अशा घोषणा देत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात विरोधकांनी सभात्याग केला.
धनंजय मुंडे यांनी यावेळी सरकार विरोधकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. नगर विकास विभागाच्या 8945.81 कोटी 68 हजार रुपयांच्या उदय सामंत यांनी मांडलेल्या, रवींद्र चव्हाण यांनी सादर केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 4822 कोटी 47 लाख 86 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या संमत करण्यात आल्या. दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गरजूंच्या घरकुलांचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागला असून 8.5 कोटी गरजुना गॅस कनेक्शन देण्यात आले असल्याचे सांगितले. रस्ते विकास, ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम अशा विविध सूचनांचा सकारात्मकपणे विचार केला जाईल असे आश्वासन दिले. ग्रामविकास विभागाच्या 5579.56 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना सभागृहाने मंजुरी दिली. महिला व बाल विकास विभागाच्या मंगल प्रभात लोढा यांनी मांडलेल्या 201.46 कोटींच्या पुरवणी मागण्यांना यावेळी मंजुरी देण्यात आली.
अधिक वाचा :