mermaid : जपानच्या ‘जलपरी’चे उलगडले रहस्य

mermaid
mermaid
Published on
Updated on

टोकियो : अर्धी स्त्री आणि अर्धा मासा अशा स्वरूपातील जलपर्‍यांचे वर्णन अनेक कथा-कादंबर्‍यांमध्ये असते. अशाच स्वरूपाच्या एका 'जलपरी'ची (mermaid) ममी जपानमध्ये अनेक वर्षांपासून लोकांच्या कुतूहलाचा विषय बनली होती. एका मच्छीमाराला सन 1736 ते 1741 या काळात हा देह सापडला होता, असे सांगितले जात असे. जपानी दंतकथेनुसार ही 'निंज्यो' होती. हा मानवी डोके असलेला माशासारखा प्राणी असतो. चाळीस वर्षे एका मठात बंदिस्त ठेवल्यानंतर हा 'देह' नंतर काचेच्या पेटीत ठेवून लोकांना दाखवला जाऊ लागला. अलीकडेच संशोधकांनी मठाच्या प्रशासनाची परवानगी घेऊन हा 'देह' तपासणीसाठी घेतल्यावर त्याबाबतचे धक्कादायक खुलासे झाले! विविध प्राण्यांच्या अवयवांचा वापर करून बनवलेली ही निव्वळ एक बाहुली होती.

ही 'जलपरी' (mermaid) सुमारे 12 इंच लांबीची आहे. ओकायामामधील एका मंदिरात लाकडी पेटीत अनेक वर्षे ही जलपरी बंद होती. जपानी दंतकथेतील ही 'निंज्यो' लोकांचे आजार बरे करून त्यांना दीर्घायुषी बनवण्यास मदत करते. मात्र ही कथाच कशी खरी आहे, हे दाखवण्यासाठी जुन्या जमान्यातील लोकांनी ही 'ट्रिक' केली होती. कुराशिकी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड द आर्टस्च्या संशोधकांनी रीतसर परवानगी घेऊन फेब्रुवारी 2022 मध्ये ही जलपरी ताब्यात घेतली. एक्स-रे आणि सीटी स्कॅनिंगसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी तिचा अभ्यास सुरू केला. तसेच तिचे रेडिओकार्बन डेटिंगही करण्यात आले. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी व डीएनए अ‍ॅनालिसिसचाही वापर करण्यात आला. 7 फेब्रुवारीला विद्यापीठातील संशोधकांनी या अभ्यासातील निष्कर्ष जाहीर केले. या जलपरीचे धड हे माकडाचे असावे, असे आधी वाटत होते; पण ते चक्क कापड, कागद आणि कापूस यांच्यापासून बनवले होते.

धातूच्या पिनांचा वापर करून ही सामग्री एकत्र जोडून हे धड बनवले होते. वाळू आणि कोळशाचा वापर करून बनवलेल्या पेस्टने ते रंगवले होते. शिवाय काही सस्तन प्राण्यांचे केस, माशाची त्वचा यांचेही आच्छादन त्यावर केले होते. तिचा जबडा व दात पफर फिशसारख्या माशाचा होता. या जलपरीचा कंबरेखालील भाग हा क्रोकरसारख्या रे-फिन्ड माशाचा होता. ही बाहुली सन 1800 च्या सुरुवातीस बनवली असावी, असे रेडिओ कार्बन चाचणीतून दिसून आले. लोकांनी 'निंज्यों'च्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा, यासाठी ही बाहुली बनवण्यात आली होती. जपानमध्ये सध्या अशा आणखी 14 'जलपरी' आहेत!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news