

पुणे : पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाने अहमदनगर जिल्ह्यातील कोटुल गावातील मुळा नदीपात्रात केलेल्या उत्खननात सापडलेल्या वस्तूंमुळे मध्ययुगीन काळातील मानवी संस्कृती आणि राहणीमान दर्शविणारे पुरावेच हाती लागले आहेत. त्याकाळी व्यवहारात वापरली जाणारी मापे आणि चलन या उत्खननात सापडले असून, अभ्यासानंतर त्याचा अहवाल केंद्रीय भारतीय पुरातत्व विभागाकडे लवकरच सादर केला जाणार आहे.
पुरातत्व उत्खननासह अंडर वॉटर पुरातत्वचे शिक्षण देणार्या देशातील एकमेव असलेल्या पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाने मुळा नदीपात्रात 26 एप्रिलपासून उत्खनन सुरू केले होते. याच टीमने 2010 मध्ये केलेल्या उत्खननात सातवाहन काळातील मानवी संस्कृती, परंपरा आणि राहणीमान याचे पुरावे हाती लागले होते. सातवाहनकालीन सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या कोटुळ गावातील लोक लेण्याद्री पायवाट-खिंडी मार्गे नालासोपारा – कल्याणपर्यंत माल पोहोचवत होते.
वर्षभरापूर्वी केलेल्या संशोधनात त्याचे पुरावेही सापडले होते. त्याआधारे सलग दहा दिवस केलेल्या उत्खननानंतर अखेर यावर शिक्कमोर्तब झाले आहे. त्या वेळची भांडी, बाजारपेठेच्या खुणा व अन्य काही महत्त्वाच्या बाबी हाती लागल्या आहेत. उत्खननात सापडलेले सर्व साहित्य जमा करण्यात आले असून, त्या वस्तू डेक्कनच्या पुरातत्व लॅबमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या लॅबमध्ये सर्व वस्तूंचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास सुरू आहे. लवकरच अभ्यास पूर्ण करून त्याचा सचित्र अहवाल केंद्रीय पुरातत्व विभागास पाठवला जाणार असल्याचे विभागप्रमुख डॉ. पांडुरंग साबळे यांनी सांगितले.
ऐतिहासिक ते मध्ययुगीन काळातील वस्तूंचे नमुने विविध थरात सापडले आहेत. यामध्ये विशेषत: खापराची भांडी, विटा व धान्य साठवण्यासाठी तयार केलेले रांजण, जनावरांचा गोठा, जेवण बनवणार्या चुली यांसह विविध दुर्मीळ वस्तू उत्खननात सापडल्या आहेत.
केंद्रीय पुरातत्व विभागाने दिलेल्या परवानगीने केलेल्या उत्खननात सातवाहन काळातील ऐतिहासिक पुरावे सापडले आहेत. राज्यातील असे पाहिले उत्खनन असून, हाती लागलेल्या वस्तूंचा अभ्यास केला जात आहे.
डॉ. पांडुरंग साबळे, विभागप्रमुख,
पुरातत्व विभाग, डेक्कन कॉलेज,
हेही वाचा