

पुढारी ऑनलाईन डेस्क : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये उफाळलेला हिंसाचार शांत होत असल्याचं वाटत असतानाच राजधानी इम्फाळमध्ये आणखी एका गोळीबाराची घटना समोर आली आहे. १९ जूनच्या मध्यरात्री सशस्त्र हल्लेखोरांनी कांटो सबल येथून इम्फाळ पश्चिमेकडील चिंगमांग गावाच्या दिशेने बेछूट गोळीबार केल्याने लष्कराचा एक जवान जखमी झाला. जखमी जवानाला लेमाखॉन्गच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. (Manipur violence)
माहितीनूसार, इंफाळ पूर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.१८) रोजी सकाळी ५ ते संध्याकाळी ५ पर्यंत कर्फ्यूची वेळ शिथिल करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून सर्वसामान्यांना औषधे आणि खाद्यपदार्थांसह जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात. जिल्हा दंडाधिकारी (इम्फाळ पूर्व) खुमंथेम डायना देवी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, "कलम १४४ CrPC, १९७३ अंतर्गत संपूर्ण सार्वजनिक कर्फ्यू, ३ मे रोजीच्या या कार्यालयीन आदेशानुसार, इंफाळ पूर्व जिल्ह्यात लागू केलेल्या त्यांच्या संबंधित निवासस्थानाबाहेर कोणत्याही व्यक्तीच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली होती. याद्वारे १८ जून रोजी सकाळी ५ ते संध्याकाळी ५ पर्यंत शिथिलता देण्यात आली होती. ही शिथिलता, सामान्य जनतेला औषधे आणि अन्न पुरवठा यासह जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी आहे. ज्या भागात कर्फ्यू शिथिल केला आहे, त्यामध्ये हट्टा क्रॉसिंग ते आरडीएस क्रॉसिंग, इंफाळ नदी संजेनथोंग ते मिनुथोंग, मिनुथोंग ते हट्टा क्रॉसिंग आणि आरडीएस क्रॉसिंग ते संजेनथॉंग यांचा समावेश आहे.
मणिपूरमध्ये 3 मे रोजी कुकी आणि मीतेई समुदायांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत. गेल्या आठवड्यात, भारतीय जनता पक्षाच्या मणिपूरच्या थोंगजू येथील कार्यालयाची जमावाने तोडफोड केली, त्याचबरोबर मणिपूरमध्ये बुधवारी (दि.१४) झालेल्या ताज्या हिंसाचारात नऊ लोक ठार झाले तर १० हून अधिक जखमी झाले आहेत.
मणिपूरमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहे.. वाढता हिंसाचार पाहता अफवा पसरू नयेत आणि लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये, म्हणून राज्य सरकारने राज्यातील इंटरनेटवरील बंदी 20 जूनपर्यंत वाढवली आहे.
हेही वाचा