

त्या म्हणाल्या, मनसेमध्ये 14 वर्षे काम केले असल्यामुळे मी कोणाबद्दल कसलीही तक्रार केली नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे माझे दैवत होते व पुढेही राहतील. त्यांच्यामुळेच मी राजकारणात आले. त्यामुळे मनसे व मनसैनिक यांच्याबाबत मी वाईट बोलणार नाही . पक्षातील काही स्थानिक लोकांच्या त्रासाबद्दल मी माझे मुद्दे ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविले होते. शेवटी पक्षातील इतरांत बदल होत नसेल, तर आपण बदलायला हवे, असे ठरवून हा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या.
पक्षाबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिवसेनेचे नेते वरुण देसाई यांना काल मी मुंबई भेटले. मात्र पक्ष प्रवेशाबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे रूपाली पाटील यांनी सांगितले. पक्षाने मला सन्मान आणि पदे दिली , त्यामुळे तो माझा वादाचा मुद्दाच नाही, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
रूपाली पाटील यांनी पक्ष सोडल्या मुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. पाटील यांनी मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून पक्ष त्याग केला, त्यामुळे मनसेत खळबळ उडाली. मनसेतील काही नेत्यांच्या अंतर्गत राजकारणाला कार्यकर्त्यांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे त्यात बदल न झाल्यास मनसेला भविष्यकाळात आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आजपासून पक्षातील शहरातील पदाधिकारी वगळून स्थानिक कार्यकर्त्यांची थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.