

Maharashtra Politics
शिवसेना म्हटले की ठाकरे असे समीकरण, गेल्या 50 वर्षांत सर्वार्थाने रूढ होते. छगन भुजबळ ते नारायण राणे या बंडानंतरही अखंडित ठाकरे ब्रँड कार्यरत राहिला. मात्र, 2021 च्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पक्षच बरोबर घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदेंमुळे ठाकरे ब्रँडचा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित झाला. उद्धव ठाकरेंची शिवसेना खाली करणार, अशा घोषणा शिंदे गटाचे नेते अधूनमधून करत असतात. अलीकडे ठाकरेंचे सहा खासदार संपर्कात असल्याचे सांगत शिंदे सेनेने नवा राजकीय ट्विस्ट आणला असतानाच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे.
खुद्द उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होईल. अंदाज कशाला मी बातमीच देईन, असे सांगत उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्याला नवे बळ दिले. सहाजिकच यावर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रतिक्रिया आल्या. काहींनी स्वागत केले तर काहींनी अप्रत्यक्ष नाराजीही व्यक्त केली. मात्र, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाल्याचे संकेत यातून पूढे आले.
दोन ठाकरे बंधू एकत्र येतायत, त्यामुळे महाविकास आघाडी मजबूत होईल, असे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निस्तेज महाविकास आघाडीला नवे बळ देण्याचा प्रयत्न केला. मविआचे काय होईल हा मुद्दा थोडासा अधांतरी असला तरी, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या नांदीमुळे मनसैनिक आणि उद्धवसैनिक यांच्यात जोश आला आहे. ठाण्यात मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि उद्धव सेनेचे दिपेश म्हात्रे यांनी सरकार विरोधात एकत्र आंदोलन करत एकत्र येत असल्याचा संदेश दिला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावरील गारुड गेली 40 वर्षे महाराष्ट्राने अनुभवले आहे. बाळासाहेबांचे पुढील वारसदार म्हणून राज ठाकरे यांचे नाव घेतले जात असतानाच उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पुढे आले. नंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाला. शिवसेना दुभंगली त्यालाही आता जवळपास दोन तपांचा काळ झाला. त्यात शिंदेंच्या बंडाने शिवसेनेची आणखी शकले झाली. या स्थितीमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणे हे शिवसैनिकांसाठी नवे टॉनिक आहे. मात्र, ठाकरे ब्रँड आता किती प्रभाव दाखवणार, हे पुढील निवडणुकाच ठरवतील. सध्यातरी काहीशा निस्तेज ठाकरे सेनेला एकीचे बळ मिळेल, एवढाच यातला अन्वयार्थ आहे.