

उमरखेड, पुढारी वृत्तसेवाः पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार करणार्या तीन शिकार्यांना अटक करून, त्यांच्या कडून चितळाचे कातडे, मांस अवयव, मुंडके व शिकारी साठी वापरण्यात आलेले जाळे वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांनी जप्त केले.
वन्यजीव विभागाने दिलेल्या माहीती नुसार, पैनगंगा अभयारण्याच्या वडगाव नियत क्षेत्रालगत कोठारी येथील डायमंड जुबली शाळेच्या पाठीमागे वडगाव नियत क्षेत्रातून चितळ या वन्यप्राण्याची अवैध शिकार करून आणल्याची गुप्त माहिती १९ जुन रोजी रात्री नऊचे दरम्यान खरबी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयास मिळाली. त्यावरुन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर माहितीची खातरजमा करून रात्री १० वाजल्या पासून आरोपीच्या वराह पालन फॉर्महाउसवर रात्रभर दबा धरून नियोजनबद्ध ट्रॅप लावला. सकाळी साडेसात वाजता आरोपी बाबू बुध्दाजी हनुमानदास यांना चितळाच्या अवयवांसहीत रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यावेळी त्याच्याकडून वन्यप्राणी चितळचे अवयव. मुंडके ( शिंगासहित ) , कातडी , पाय ( 4 नग ) जप्त करण्यात आले . तसेच त्याच्या चौकशी दरम्यान सदर गुन्ह्यात त्याचा सोबती आरोपी मारोती नामदेव आरमाळकर याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये शिकारीसाठी वापरण्यात आलेले जाळे ( वाघुर ) 5 नग जप्त करण्यात आले. यामधील दुसरा आरोपी मारोती नामदेव आरमाळकर याच्यावर यापूर्वीही अभयारण्यामध्ये रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार केल्याचा गुन्हा दाखल आहे.
गुन्ह्यामध्ये वापरलेले शिकारीचे जाळे मारोती माधव मेंडके याच्या मालकीचे असल्याने त्यालाही ताब्यात घेवून तिन्हीही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा नोंदविण्यात आला . सदर आरोपींना उमरखेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये अजून किती आरोपींचा समावेश आहे याची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा