बुलढाणा : विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी शिक्षकाला न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला

buldhana
buldhana

बुलढाणा -पुढारी वृत्तसेवा : येथील निवासी सैनिकी शाळेतील इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी शिक्षकाने अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला.

याप्रकरणाची माहिती अशी की, बुलढाणा येथील एका शिक्षण संस्थेच्या अनुदानित निवासी सैनिकी शाळेतील विज्ञान विषयाचा शिक्षक धर्मेंद्र उत्तम हिवाळे (वय ५०) या अविवाहित शिक्षकाने इयत्ता दहावीतील दोन विद्यार्थ्यांवर शाळेच्या विज्ञान प्रयोगशाळेत १८ ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान अनेकवेळा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास प्रात्यक्षिक परीक्षेत नापास करेल व ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. अखेर हा घृणास्पद प्रकार असह्य झाल्याने एका पीडित विद्यार्थ्याने शहर पोलीस ठाणे गाठून घटना सांगितली. शिक्षक धर्मेंद्र हिवाळे याच्याविरूद्ध अनैसर्गिक लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती.

शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारा हा विकृत प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपी शिक्षकावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. तेव्हापासून तो फरार आहे. दरम्यान या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी शिक्षक हिवाळे याने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर बुधवार ८मार्च रोजी सुनावणी झाली. न्या. आर. आर. मेहेरे यांनी आरोपी शिक्षकाचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज नामंजूर केला आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. व्ही. एल. भटकर यांनी बाजू मांडली. दरम्यान शाळा व्यवस्थापनाने आरोपी शिक्षक हिवाळे याला सेवेतून बडतर्फ केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news