पुणे : देहविक्रय करणार्‍या महिलांसाठी ’धारा मेळा’ | पुढारी

पुणे : देहविक्रय करणार्‍या महिलांसाठी ’धारा मेळा’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बुधवार पेठेतील देहविक्रय व्यवसाय करणार्‍या महिला व ट्रान्सजेंडर समुदायासाठी पर्णकुटी संस्थेच्या वतीने ‘धारा मेळा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिलादिनाचे औचित्य साधून बुधवार पेठेत आयोजित या कार्यक्रमाला पर्णकुटी संस्थेच्या सहसंस्थापिका स्नेहा भारती, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे प्रकाश यादव, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे अभिजित लोंढे व सहकारी, स्वस्ती संस्थेचे गिरिजा ठाकूर व शिवाजी मोरे, मंथन संस्थेच्या आशा भट्ट, कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालयाच्या मृदुला जक्कल तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका रायरकर, दीपक बनकर, उदयकाळ फाउंडेशनचे नीलेश बागुल, प्रेरणा वाघेला, शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे सुरेश उमप, तसेच बुधवार पेठ परिसरामध्ये काम करणार्‍या संस्था व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवार पेठ परिसरामध्ये देहविक्रय व्यवसाय करणार्‍या महिला व त्यांची मुले, एचआयव्ही संसर्गित व बाधित तसेच ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी संस्थेच्या ‘धारा’ प्रकल्पांतर्गत आयोजित कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या वेळी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर झाले. तसेच जीवनावश्यक पौष्टिक आहार किटचे वाटप करण्यात आले. दरम्यान, या महिला व ट्रान्सजेंडर व्यक्तींनी बनविलेल्या कुकीज, चॉकलेट व डोनट, कापडी पिशव्या, चहा मसाले, हर्बल साबण, पेपर पिशव्या अशी विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. पूनम लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. पर्णकुटी संस्थेच्या सहसंस्थापिका स्नेहा भारती आणि कार्यक्रम समन्वयिका प्रभावती मुळे यांनी आभार मानले.

Back to top button