

यवतमाळ : पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना देऊरवाडी लाड येथे मंगळवारी (दि.३) रात्री घडली. याप्रकरणी लाडखेड पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. रोहन दीपक चामलाटे (वय २०, रा. देऊरवाडी) असे मृताचे नाव आहे.
विधिसंघर्षग्रस्त बालकाने जुन्या वादातून युवकाच्या गळ्यावर धारदार चाकूने तीन ते चार वार केले. यामुळे युवक गंभीर जखमी होऊन रक्तस्राव सुरू झाला. या घटनेनंतर विधिसंघर्षग्रस्त बालक पसार झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिस देऊरवाडीत दाखल झाले. त्यानंतर विधिसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन त्याला दारव्हा रोड येथून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी रेखा दीपक चामलाटे यांनी लाडखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार विनायक लंबे, पीएसआय नायभाये, सहायक फौजदार प्रकाश रत्ने, उमेश शर्मा करीत आहेत.