

सांगली : किरकोळ भांडणातून बुधगाव (ता. मिरज) येथे सेट्रींग कामगाराचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. सिंकदर मौला शिकलगार (वय ४९, रा. वसंत घरकुल, बुधगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित रफीक मेहबुब पट्टेकरी (वय ५४, रा. वनवासवाडी, बुधगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला.
याप्रकरणी मृत शिकलगार यांचा भाचा शब्बीर रसूल शिकलगार याने पोलिसांत फिर्याद दिली. याबाबत माहिती अशी की, मयत शिकलगार सेट्रींग मेस्त्री असून संशयित पट्टेकरी त्यांच्याकडे मदतनीस म्हणून कामाला होता. काही दिवसांपूर्वी गावातील एक काम शिकलगार यांना मिळाले होते. पण संबंधित व्यक्तीने ते काम शिकलगार यांच्याकडून काढून घेऊन दुसऱ्याच व्यक्तीला दिले. ज्या मिस्त्रीला हे काम दिले त्याच्याकडे रफीक पट्टेकरी कामाला जाऊ लागला होता. याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी रात्री अकराच्या सुमारास शिकलगार याने पट्टेकरी याला तु माझे काम काढून घेतले, दुसऱ्याकडे कामाला का गेलास? म्हणून कानशिलात लगाविली. त्याचा राग पट्टेकरी याला होता.
गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास पट्टेकरी हा चाकू घेऊन बुधगावमधील झेंडा चौकात आला. तेव्हा त्याने मद्यपान केले होते. थोड्या वेळातच शिकलगार हेही तिथे आले. त्यांना पाहताच पट्टेकरी याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. शिकलगार जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. पट्टेकरीही हातात चाकूने घेऊन घटनास्थळी बसून होता. हल्ल्याची माहिती मिळताच झेंडा चौकात नागरिकांनी गर्दी केली. काही नागरिकांनी धाडस करीत पट्टेकरी याच्याकडील चाकू काढून घेतला. जखमी शिकलगार यांना खासगी वाहनातून उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण चाकूचा घाव वर्मी लागल्याने व अति रक्तत्रावामुळे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
बुधगावमध्ये हल्ल्याची माहिती ११२ वरून पोलिसांना कळाली. सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित रफीक पट्टेकरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चाकू जप्त केला. पोलिस उपअधिक्षक विमला एम. यांनी भेट देत तपासाबाबत सूचना केल्या.