यवतमाळ : बारमध्ये दोघात वाद झाला. हुल्लडबाजी करणाऱ्याला समजावून सांगणे अंगलट आले. बारमधून बाहेर येताच दबा धरून बसलेल्या तिघांनी चाकूने हल्ला करून एकाला ठार केले. तर दुसरा गंभीर जखमी आहे. घटनास्थळावरून इतर दोघे पळाल्यामुळे बचावले. ही थरारक घटना रविवारी (दि.२०) रात्री ११ वाजता घडली. परमेश्वर मधुकर जाधव (३५, रा. गोविंदनगर, जांब रोड) असे मृताचे नाव आहे. तर वैभव रत्नाकर इंगोले हा युवक गंभीर जखमी आहे.
परमेश्वर, वैभव, ऋषभ कोटोडे, गणेश राठोड हे आर्णी मार्गावरील राजधानी बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. तेथेच बाजूच्या टेबलवर आरोपी उत्कर्ष ऊर्फ मन्नू अनिल जयस्वाल (२५, रा. यवतमाळ), आकाश कुबडे, ऋषिकेश खाडे हेसुद्धा दारू पित होते. त्यांनी अचानक येथे गोंधळ घालणे सुरू केले. त्या तिघांची समजूत काढण्यासाठी परमेश्वर जाधव गेला असता मन्नू जयस्वाल याने शिवीगाळ करीत गालावर चापट मारली. यामुळे संतापलेल्या परमेश्वरने येथील बॉटल उचलून मन्नूच्या डोक्यात हाणली. वाद वाढत असल्याचे पाहून बारमध्ये व्यवस्थापकाने गोंधळ घालणाऱ्या तिघांना बाहेर काढले.
त्यानंतर परमेश्वर जाधव व त्याचे इतर तीन साथीदार हे चौघे जण रात्री ११ वाजता बारमधून बाहेर पडले. त्यावेळी मन्नू जयस्वाल व त्याचे दोन सहकारी हल्ला करण्याच्या तयारीत दबा धरून होते. मन्नूने धारदार चाकूने परमेश्वरवर हल्ला चढविला. त्याच्या छातीत, पोटात व डोक्यावर चाकूने वार केले. परमेश्वरला वाचविण्यासाठी वैभव इंगोले पुढे आला असता त्याच्यावरही चाकूने वार केले. नंतर ते तेथून पळून गेले. जखमी परमेश्वर व वैभव या दोघांना शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोघांवरही तातडीने शस्त्रक्रिया केली. मात्र परमेश्वरच्या वर्मी घाव लागल्यामुळे त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला, अशी तक्रार गणेश धर्मा राठोड (रा. चाणी कामठवाडा) याने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास एसडीपीओ दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार नरेश रणधीर, सहायक निरीक्षक रोहित चौधरी करीत आहे.