Satara Murder | चुलत्याकडून चिमुरड्या पुतण्याचा खून

दगडाने ठेचले डोके; रस्त्यात आडवा आल्याच्या कारणातून कृत्य
Satara Murder
रस्त्यात आडवा आल्याच्या कारणातून कृत्यpudhari
Published on
Updated on

वरकुटे-मलवडी : मेंढ्या घरी घेऊन जात असताना रस्त्यात आडव्या बसलेल्या पुतण्याला बाजूला हो, असे सांगितल्यानंतरही त्याने ऐकले नाही. यामुळे मेंढ्या इतरत्र पळू लागल्याच्या रागातून चुलत चुलत्यानेच चार वर्षाच्या चिमुरड्याचा दगडाने डोके ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथे घडली. या घटनेमुळे माण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित नराधम चुलत्यास म्हसवड आकाराम गाढवे पोलिसांनी अटक केली आहे. शिवतेज सचिन गाढवे (वय ४) असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. तर आकाराम धोंडीराम गाढवे (वय ३५) असे संशयित चुलत्याचे नाव आहे. महाबळेश्वरवाडी येथील शिवतेज गाढवे हा अंगणवाडीमध्ये शिकत होता. शिवतेजला मेंढराचा लळा लागला होता. दररोज चुलते मेंढरं घरी घेऊन येणाऱ्या वाटेवर आडवा जात होता. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शाळेतून घरी आल्यावर शिवतेज महाबळेश्वरवाडी ते काळचौंडी रस्त्यावर गेला होता. दरम्यान, श्रीपती गाढवे हे मेंढरं घरी घेऊन येत असताना रस्त्यापासून काही अंतरावर पाझर तलावाच्या सांडव्याच्या पायथ्याशी शिवतेज पालथ्या अवस्थेत निपचित पडल्याचे दिसले. तसेच त्याच्या डोक्यात, पाठीत, हनुवटीवर, कपाळावर दगडाचे वार असल्याचे दिसून आले. त्याच्या अंगातून रक्तस्त्रावही होत होता. यावेळी संशयित आकाराम हा घरी जात होता. श्रीपती यांनी आरडाओरडा करत आकारामला बोलावले. तसेच त्यांनी याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर सर्वजण घटनास्थळी आले.

शिवतेजला उपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोनि सखाराम बिराजदार, पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. शिवतेजचे आजोबा सदाशिव दादा वाघमोडे यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेनंतर शिवतेजच्या अंगावर खुणा कशा व त्याला कुणी मारले? असा प्रश्न उपस्थित झाला. पोलिसांनी श्रीपती गाढवे व आकाराम गाढवे यांच्याकडे चौकशी केली. यामध्ये आकाराम याच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने शिवतेजचा खून आपणच केल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, मी मेंढरे घेवून घरी जात असताना शिवतेज हा रस्त्यात आडवा बसला होता. त्याला रस्त्यातून बाजूला हो असे सांगितले. शिवतेज रस्त्यात आडवा बसल्याने मेंढरे इतरत्र पळत होती. या रागातूनच शिवतेजचे डोके दगडाने ठेचून त्याचा खून केला. यावेळी माझा मुलगाही सोबत होता. त्यालाही याविषयी कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आकाराम याने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news