सिल्लोड, पुढारी वृत्तसेवाः पती पत्नीचा घरगुती कारणावरून जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथील तिघांनी चाकूने भोसकून पतीचा खून केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पती ठार झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी सोमवारी सायंकाळी तिघा आरोपीविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहे.
या घटनेत खून झालेल्या इसमाचे नाव शंकर गजू (गजानन) टटवारे (वय ३० वर्षे रा. खंडवा (म.प्र.) ह.मू. डोंगरगाव ता. सिल्लोड) असे आहे तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव पुजा शंकर टटवारे ( वय २५ वर्ष रा. खंडवा (म.प्र.) ह.मू. डोंगरगाव ता. सिल्लोड ) असे आहे. तर खून करणाऱ्या आरोपींची नावे अतिष फूलचंद नागणे, अमोल फूलचंद नागणे, सविता प्रल्हाद गायकवाड ( सर्व रा. चदनझिरा ता.जि. जालना ) असे आहे.
सुनील संजय सोनवणे मयत शंकर यांचा साला यांनी दिलेल्या तक्रार वरून पोलिसांनी वरील तिथा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील मयत शंकर गजू (गजानन) टटवारे यांचा साला अनिल संजय सोनवणे हा गेल्या ५ वर्षापासून काम करण्यासाठी संभाजी नगर येथील कंपनीत गेले होते. त्यांचा जालना जिल्ह्यातील चंदन झिरा येथील सुनीता नागणे यांच्या सोबत प्रेम विवाह झाला होता. मात्र, गेल्या आठ महिन्यापासून पती पत्नीत पटत नसल्याने भांडण झाल्याने अनिलची पत्नी सुनीता माहेरी चंदन झिरा येथे गेली होती. तिला आणण्यासाठी अनिल रविवारी दुपारी चंदन झिरा येथे गेला होता.
तेथे सासरच्या लोकांत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अनिल तिच्या पत्नीला घेऊन छत्रपती संभाजी नगर येथे निघून गेला. सासरच्या लोकांना सुनीताला पाठवायचे नव्हते म्हणून चंदन झिरा येथून अनिलचे दोन्ही साले अतिष नागणे, अमोल नागणे, व साली सविता प्रल्हाद गायकवाड ( सर्व रा. चदनझिरा ) हे दाजी अनिल सोनवणे व बहीण सुनीताला शोधत सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे आले. मात्र, तेथे हे दोघे नव्हते घरात अनिलचा भाऊ सुनील वडील संजय व दाजी शंकर व बहीण पूजा होती.
वरील तिन्ही आरोपीना अनिल कुठे आहे दाखवा काढा त्याला बाहेर? असे म्हणून अनिलच्या वडिलांना व भावाला मारहाण केली. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी अनिलचे दाजी शंकर टटवारे व त्यांची पत्नीचे पुजा टटबारे आले असता आरोपी अमोल व अतिष यांनी कमरेला लावलेला चाकू काढून शंकर टटवारे यांच्या पोटात व छातीत सपासप वार करून भोसकून त्यांचा खून केला. पतीला वाचवण्यासाठी त्यांची पत्नी पूजा मधी आली असता वरील तिघा आरोपीना तिच्यावर सुद्धा चाकूने हल्ला केला. खून करून आरोपी मोटार सायकल वर बसून पळून गेले होते.
त्यापैकी पोलिसांनी आरोपी अमोल नागने याला अटक केली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शंकर व पूजाला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रात्री १२ वाजता डॉक्टरांनी शंकरला मयत घोषित केले. तर पूजावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली आहे. तपास विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन क्षीरसागर, लहू घोडे, सचिन सोनार करत आहे.