

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन वर्षांपूर्वी प्रसूती झालेल्या महिलेला मुलाच्या जन्माच्या दाखल्यासाठी वीरूगिरी करावी लागली. वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असणारी ही महिला जन्म दाखला मिळावा यासाठी शुक्रवारी ती महिला जन्म-मृत्यू नोंद होणाऱ्या विभागात पोहोचली. तेथे तिने जन्म दाखल्यासाठी अर्ज केला. सायंकाळपर्यंत दाखला न मिळाल्याने महिला संतापली, थेट रुग्णालयाच्या छतावर पोहोचली. तेथून आत्महत्येची धमकी दिली. हा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी तिला खाली उतरविले.
मोनिका राजेश सातघरे, रा. हिंगणी, जि. वर्धा, असे आंदोलन करणाऱ्या महिलेचे नाव आहे. मोनिकाची तीन वर्षांपूर्वी शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली. तिला मुलगा झाला. मुलाच्या शालेय प्रवेशासाठी जन्म दाखल्याची गरज भासली. तिने येथील जन्म-मृत्यू विभागांत दाखल्यासाठी अर्ज केला. वारंवार चकरा माराव्या लागल्या.
प्रत्येक वेळी नवी अडचण सांगण्यात आली. शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करूनही मुलाच्या जन्माचा दाखला मिळत नाही, हे लक्षात येताच मोनिकाचा संयम सुटला. ती थेट रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचली. तेथून तिने आत्महत्येचा इशारा दिला. हे रुग्णसेवकांच्या निदर्शनास आला. त्यांनी ही माहिती सुरक्षा रक्षकांना दिली. सुरक्षा रक्षकांनी महिलेची समजूत काढत तिला खाली उतरविले. दरम्यान, नोडल अधिकारी डॉ. शरद राखुंडे तेथे पोहोचले. त्यांनी महिलेची समजूत काढत तिला शांत केले व अडचण विचारली. ही महिला चुकून नवीन जन्म दाखला काढण्याच्या रांगेत लागली. तिने यापूर्वी २०२३ मध्ये जन्माचा दाखला नेला होता. परंतु हे न सांगितल्यामुळे तिला कागदपत्रांची मागणी केली. त्या महिलेला जन्मदाखल्याची दुय्यम प्रत देवून तिच्या गावाकडे पाठविण्यात आले.