

उमरखेड: वर्धा- नांदेड , रेल्वेमार्गावरील हर्षी घाटात पुसद उपविभागातील पहिल्या रेल्वे बोगद्याचे (टनेल) बांधकाम शुक्रवारी पूर्ण झाले. ३७० मीटर लांबीच्या बोगदा निर्मितीसाठी १८० दिवस लागल्याची माहिती आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८० किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरील पूर्णत्वास गेलेला हर्षी येथील हा पहिला बोगदा ठरला आहे.
बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-पुसद- उमरखेड ,नांदेड या २८० किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पांतर्गत हर्षी महादेव मंदिरासमोरील बोगदा क्रमांक ३ चे काम पूर्ण झाले. तत्कालिन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते २००९ मध्ये या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. रेल्वे प्रकल्पाचे काम आता प्रगतिपथावर असल्याने समाधान व्यक्त होत आहे. हर्षीं येथील बोगदा क्रमांक ३ चे खोदकाम पूर्ण करत तोंड उघडण्यात आले. काम पूर्ण झालेला पुसद उपविभागातील हा पहिला टनेल आहे. ३७० मीटर लांबीचा हा बोगदा आहे.
या बोगद्याचे बांधकाम रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या निर्देशानुसार पूर्ण करण्यात आले आहे. पुसद उपविभागातील रेल्वेची लांबी ५८.३१ किलोमीटर आहे. उमरखेड व पुसद तालुक्यात एकूण तीन बोगदे असून, धुंदी घाटातील ४-किलोमीटर लांबी व शिळोना घाटातील २ किलोमीटर लांबीच्या टनेलचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे रेल्वेचा प्रवास कमी वेळेत, स्वस्त, सुरक्षित होणार असून, या भागातील शेतकऱ्यांसह उद्योगांनाही या रेल्वेमार्गाचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये रेल्वे रुळाचे काम पूर्ण होणार आहे. सद्यस्थितीत तालुक्यात रेल्वेचे काम प्रगतिपथावर आहे.