

यवतमाळ : किरकोळ कारणावरून कौटुंबिक वाद विकोपाला जावून मुलानेच जन्मदात्या वडिलांवर टेबलने हल्ला चढविला. यात वडील गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. काही क्षणातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. नेर तालुक्यातील कुरेगाव शिवारात मंगळवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने पंचक्रोशित खळबळ उडाली आहे.
सुनील लिहार (वय ५०, रा. कुरेगाव) असे मृत जन्मदात्याचे तर लोकेश सुनील लिहार (वय २५, रा. कुरेगाव) असे आरोपी मुलाचे नाव आहे. कौटुंबिक कारणावरून मंगळवारी सायंकाळी त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. यावेळी कुटुंबीय लोकेशची समजूत घालत होते. मात्र, त्याने कुणाचे काही एक न ऐकता घरातील टेबलनेच वडील यांच्यावर प्रहार केले. त्यामध्ये डोक्याला आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे वडील रक्ताच्या थारोळ्यात कोसळले यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती नेर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच येथील प्रभारी ठाणेदार दामोदर वाघमारे, फौजदार बदर, मनोहर पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. आरोपी मुलगा लोकेश याला अटक केली.